गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अनेक शेतकऱ्यांचे ऊस हे फडातच आहे. यामुळे आता आपला ऊस जाणार की नाही याची याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. अनेकांच्या उसाला तुरे आले आहेत, तर काहींचा ऊस जळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी आंदोलने देखील होत आहेत. असे असताना आता या उसाचे करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. (Sugar Factory) साखर कारखान्यांकडून नियोजन हुकले असले तरी (Sugar Commissioner) साखर आयुक्त कार्यालयाकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सुरु आहे.
यावर आता शेतकरी पर्याय शोधत आहेत. असे असताना आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव येथे मात्र ऊसतोड कामगार दाखल होताच त्यांचे वाजत-गाजत स्वागत आणि सत्कार करण्यात आला. हा प्रकार हे जरी अवास्तव वाटत असले तरी खरे आहे. कारण याच ऊसतोड कामगारांमुळे तब्बल 20 ट्रक ऊसाचे गाळप शक्य झाले आहे. यामुळे मोठे नुकसान टळले आहे.
कारखाना क्षेत्र नसतानाही सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ शुगर्सने उस्मानाबाद मधील नायगावच्या शेतकऱ्यांचे गऱ्हाणे ऐकूण ऊसतोडीचा निर्णय घेतला. कारखान्याने घेतलेली दखल आणि ऊस कामगारांचे परिश्रम यामुळे शेतकऱ्यांनी वाहनचालक, ऊसतोड कामगारांचे वाजत-गाजत स्वागत तर केलेच पण तोडणीसाठी त्यांना मदतही केली. असेच उपाय काढले तर ऊस गाळप लवकर होणार आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सध्या कालावधी पूर्ण होऊनही ऊसाची तोड होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गेटकेनचा ऊस असतानाही गोकुळ साखर कारखान्याने तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तब्बल 20 ट्रक आणि ऊसतोड कामगार येताच शेतकऱ्यांना मोठा आनंद झाला. शेतकऱ्यांनी ऊसतोड कामगारांचे हलगी वाजत आणि गुलालाची उधळण करीत स्वागत केले. एवढेच नाही वाहनचालक, कामगार यांना हार, तुरे, शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
यामुळे ऊसतोड कामदार देखील खुश झाले. दरम्यान, ऊसतोड कामगारांनी 10 ट्रक ऊसाची तोडणी करुन गाळपासाठी साखर कारखान्याकडे पाठविला आहे. शिवाय उर्वरीत ऊसही लागलीच तोडला जाणार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. असे असताना राज्यात इतर ठिकाणी अनेकांचे ऊस रानातच आहेत. यामुळे आपला ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ सुरु आहे. शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान होणार आहे.
Published on: 01 March 2022, 11:21 IST