राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढतच आहे. सोमवारी सोलापूर येथे यंदाच्या हंगामात आतापर्यंतच्या उच्चांकी ४९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उन्हाच्या चटक्यासह उकाडाही वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात पोषक हवामान असल्याने पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यातील काही भागात तापमानाने ४० चा पारा गाठला आहे. राज्यातील अनेक भागातील तापमान ३६ ते ४० अंशांच्या आसपास होते. सोलापूर आणि मालेगावमध्ये ४१ अंश सेल्सिअस तापमान होते, तर परभणी येथे ४०. ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने दुपारी घराबाहेर पडणे असह्य होत असून रात्रीही उकाडा कायम आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत. विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा दाबाचा पट्टा आहे. यामुळे पूर्व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, देशाच्या इतर राज्यातही पुढील दोन दिवसात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २४ तासात केरळ आणि दक्षिण तमिळनाडूत हलक्या प्रतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व आसाम आणि अरुणाच प्रदेशातही पाऊस होऊ शकतो. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमाल व किमान तापमान - पुणे ३९.३, जळगाव ३९.६, कोल्हापूर ३७.६, महाबळेश्वर ३२.२, मालेगाव ४१.२, नाशिक ३८.४, निफाड ३५.२, सांगली ३८.२, सातारा ३९.२, सोलापूर ४१.९, डहाणू ३२.८, सांताक्रुझ ३३.२, रत्नागिरी ३२.०, औरंगाबाद ३७.६, परभणी ४०.६, अकोला ३९.६, अमरावती ३७.६, बुलढाणा ३६.२, ब्रुह्मपुरी ३८.९, गोंदिया ३६.६, नागपूर,३७.६, वर्धा ३७.०.
Published on: 07 April 2020, 12:40 IST