असनी चक्रीवादळ ओसरताच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून हे वारे १५ मे रोजी दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची अपेक्षा आहे. असे हवामान खात्याने गुरुवारी सांगितले. नैऋत्य मोसमी वारे दरवर्षी १८ ते २० मे दरम्यान अंदमानात प्रवेश करतात. यंदा मात्र अनुकूल परिस्थिती असल्याने वारे पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
असनी चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने बुधवारी संध्याकाळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्ट्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्यामुळे १२ मे रोजी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे. किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास आहे. या सर्व घडामोडींमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्यास मदत झाली आहे. यामुळे यंदा हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजापेक्षाही पाच दिवस आधीच र्नैऋत्य मोसमी वारे या भागात दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, लक्षद्वीप आणि नागालँड, मिझोराम आणि त्रिपुराच्या ईशान्येकडील भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि महाराष्ट्रातील विदर्भात १६ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे.
गेल्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासचे कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे गुरुवारी मुंबई आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात गुरुवारी सरासरी कमाल ३४0 ५ अंश सेल्सिअस आणि किमान २८0 २ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात सरासरी ३३0 २ कमाल आणि २७0 ६ किमान तापमानाची नोंद झाली.
असनी चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड सिग्नल जारी केला आहे. चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही भागांवर परिणाम होणार आहे. चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ हवामानाचा अंदाज आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सांगली येथे हवामान ढगाळ राहणार असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.
महत्वाच्या बातम्या
मोसमी पाऊस(वारे)15 मे रोजी अंदमानात,20 ते 26 मे केरळ आणि 27 ते 2 जून तळकोकणात करणार एन्ट्री- आयएमडी
Published on: 13 May 2022, 09:59 IST