News

घरकुलापासून कोण वंचित आहे, ‘ड’ यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे, अशा सर्वांना घरकुल देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या जवळ घरकुलसाठी जमीन नाही, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी अधिकारी – कर्मचारी आदिवासी समाजापर्यंत पोहचत नाही तर काही ठिकाणी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे आदिवासी वस्ती, गावे, पोडे पोहचण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ता योजना सुरु केली आहे.

Updated on 26 February, 2024 10:24 AM IST

चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गावापर्यंत रस्ते तसेच गावातील प्रत्येक घरापर्यंत वीज आणि पाणी देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. राज्य शासन आणि आदिवासी विकास विभागही यासाठी प्रयत्नशील असून येत्या दोन वर्षात 100 टक्के आदिवासी बांधवांना घरकुलचा लाभ देण्यात येईल. घरकुलापासून एकही आदिवासी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली.

चंद्रपूर येथील नियोजन सभागृहात आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित अनुसूचित जमातीच्या विविध योजनांचा लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, नागपूर येथील आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त जी.एस. कुळमेथे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, हरीश शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, श्री. इंगळे, श्री. मडावी, रामपालसिंग, सयाराम गोटे आदी उपस्थित होते.

आदिवासी जनतेचे प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी व हा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून मंत्री गावित म्हणाले, घरकुलापासून कोण वंचित आहे, ‘ड’ यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे, अशा सर्वांना घरकुल देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यातील एकही आदिवासी बांधव घरापासून वंचित राहणार नाही. ज्यांच्या जवळ घरकुलसाठी जमीन नाही, त्यांच्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. काही ठिकाणी अधिकारी – कर्मचारी आदिवासी समाजापर्यंत पोहचत नाही तर काही ठिकाणी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध नाही. त्यामुळे आदिवासी वस्ती, गावे, पोडे पोहचण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ता योजना सुरु केली आहे.

पुढे ते म्हणाले, आदिवासी विकास विभागाने रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. तसेच इतर उर्वरीत ठिकाणच्या रस्त्यासाठी व पुलासाठी आणखी निधी दिला जाईल. विजेचा प्रश्न सोडविण्यासाठीसुध्दा निधी दिला जाईल. रस्ता, वीज, पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुढे मंत्री गावित म्हणाले, दरवर्षी एक ते दीड हजार आदिवासी बांधवांना व्यवसाय करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यापूर्वी फक्त प्रशिक्षण देण्यात येत होते. आदिवासी बांधवांनी आता समोर येणे आवश्यक आहे, आदिवासींच्या कल्याणासाठी हा विभाग मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री गावित यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी प्रास्ताविकातून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी आदिवासी विकास विभागाचे सादरीकरण केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा आणि शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पुजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प योजनेंतर्गत 24 लाभार्थी, ठक्करबाप्पा योजनेंतर्गत 7 गावांचे मंजुरी आदेश, घरकुल योजनेंतर्गत 30 लाभार्थी, बचत गटाचे लाभार्थी यांना लाभ देण्यात आला.

English Summary: We will give 100 percent shelter to tribal brothers in two years Tribal Development Minister Vijayakumar Gavit
Published on: 26 February 2024, 10:24 IST