कलिंगड हंगामाच्या सुरुवातीला विक्रमी दरात विक्री होतं होते. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होण्याची आशा होती. मात्र, बाजारपेठेत कलिंगडाची आवक वाढल्याने सध्या कलिंगड अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसत आहे.
गत दोन वर्ष कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनामुळे कलिंगड विकण्यास नाना प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी लॉकडाउन असल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना वावरातील कलिंगड विक्री करता आले नाही. यावर्षी मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या कमाईची आशा होती. मात्र, सुरुवातीचा काही काळ वगळता यंदा कलिंगडास अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
हे कमी होते की काय म्हणून वर्धा जिल्ह्यातील बेलोरा गावात रानडुकरांनी एका रात्रीतून तब्बल अडीच एकर क्षेत्रावरील कलिंगड उध्वस्त केले. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. विशेष म्हणजे हे पहिल्यांदा घडलं आहे असे नाही शिवारातील शेतकऱ्यांना दर वर्षी उन्हाळी हंगामात रानडुकरांच्या उपद्रवास सामोरे जावे लागते. मात्र असे असले तरी अजूनही यावर कोणत्याच उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. यामुळे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील आर्वी तालुक्याच्या मौजे बेलोरा येथील कलिंगड उत्पादक शेतकरी प्रफुल्ल जाणे दरवर्षी कलिंगड पिकाची लागवड करत असतात. या वर्षी देखील या शेतकऱ्याने अडीच एकरामध्ये कलिंगडची लागवड केली होती. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे मार्केट मिळाले नाही म्हणून आधीच संकटात सापडलेले प्रफुल्ल या वर्षी एका वेगळ्याच कारणामुळे संकटात सापडले आहेत.
यावर्षी कलिंगड पीक ऐन बहरात असतानाच रानडुकरांनी कलिंगड पीक एका दिवसातच उध्वस्त केले आहे. यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये सदर शेतकऱ्याला लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले गेले आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा घडलेला प्रकार नवखा नसून याआधी देखील अनेक शेतकऱ्यांना यामुळे हजारो रुपयांचा फटका बसला आहे. मात्र वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अजून कुठलीच उपाययोजना केलेली नाही.
दरम्यान या शिवारातील शेतकऱ्यांकडून यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रफुल्ल यांचे कलिंगड अवघ्या दहा दिवसात मार्केटमध्ये दाखल होणार होते मात्र त्याआधीच रानडुकरांनी प्रफुल यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील कलिंगड पीक उद्ध्वस्त केल्याने त्यांना लाखोंचा फटका बसला आहे. निश्चितच आधीच दरात झालेल्या घसरणीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी हा एक मोठा धक्का आहे.
Published on: 30 April 2022, 10:33 IST