सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे शेतात असलेल्या पिकांना वेळेत पाण्याचा पुरवठा होण्याची नितांत गरज आहे. एवढ्या उन्हाच्या तडाख्यात जर पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर पिके करपून जाण्याची दाट शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर इटियाडोह पाटबंधारे विभाग व पाणी वापर संस्थांनी या परिसरातील म्हणजेच अरसोडा व पालोरा, आरमोरी इत्यादी परिसरातील शेतकऱ्यांना धान पिकाला पाणी देण्यात येईल अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु पंधरा ते वीस दिवस उलटून देखील इटियाडोह पाटबंधारे विभाग डोळे लावून बसलेला होता व आता धान पिकाला नितांत पाण्याची गरज होती त्यामुळे हे पीक धोक्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला पण लागलीच पाटबंधारे विभागाला जाग आल्यासारखे प्रकल्पातील पाणी सोडले.
त्यामुळे या परिसरातील धान उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी अगोदरच इटियाडोह पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना पिकांना पाणी मिळेल असे सांगून पाण्याची वसूल केले होते. या आश्वासनामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाची पेरणी केली. परंतु आता या पिकाला पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज असताना देखील पाणी सोडण्यात येत नव्हते. शेतात उभे असलेले धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. शेतकऱ्यांनी या विभागाला वारंवार पाणी सोडण्याची विनंती केली तरीदेखील पाणी सोडण्यात येत नव्हते त्यामुळे शेतकरी एकतर पाणी द्यावे किंवा नुकसानभरपाई द्या अशा पद्धतीची मागणी शेतकरी करीत होते.
जर पाणी सोडण्यात आले नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला होता. या सगळ्या प्रकाराची दखल घेत इटियाडोह पाटबंधारे विभागाने तात्काळ पाणी सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व या परिसरात असलेल्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या तीनशे एकर पेक्षा जास्त धान पिकाला जीवदान मिळाले आहे.
Published on: 18 April 2022, 07:57 IST