रायगड जिल्ह्यात कोरोनाचा (corona virus) प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक भागात आता पाणी टंचाईचे संकट आले आहे. जिल्ह्यातील ११९ गाव आणि वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरूवात झाली आहे. या गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यातील ११९ गाववाड्यामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता १२ टँकर्सच्या मदतीने या गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पेण तालुक्यात ९ गावे, ६१ वाड्या, रोहा तालुक्यात ४ गाव, २ वाड्या, महाड तालुक्यात १ गाव २ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात १३ गाव, २७ वाड्या अशा ११९ गाव वाड्या. तर रोहा तालुक्यातील २ हजार ८९६ लोक पाणी समस्येने बाधीत झाले आहेत. त्यामुळे पेण तालुक्यात सात, पोलादपूर तालुक्यात तीन तर महाड तालुक्यात दोन टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या मॉन्सून मध्ये रायगड जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला होता. पाऊस अधिक झाल्यामुळे पाणी टंचाई जाणवणार नाही अशी आशा येथील लोकांना होती. पण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पेण, रोहा, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेक गावात पाणी समस्या निर्माण होण्यास सुरवात झाली आहे. पाणी टंचाई असलेल्या गावांना टँकरनी पाणी पुरवठा सुरू केला आहे, गरज असेल तिथे विंधन विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी योजनांची काम पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.
Published on: 23 April 2020, 03:48 IST