Thane Water Issue News : मुंबईला पाणी पुरवणाऱ्या धरणाजवळील शहापूर तालुक्याला देखील यंदा पाणीटंचाईचा फटका बसला आहे. शहापूर तालुक्यातील ओव्हळवाडीत महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतं असल्याचं चित्र आता दिसून आलं. तसंच राज्यात गेल्यावर्षी सर्वत्र कमी पाऊस झाल्यामुळे यंदा पाणीसाठ्याने लवकरच तळ गाठल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं चित्र संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेशाच्या अनेक भागात पाणीबाणीची टंचाई दिसून येत आहे. महिलांना आणि लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील प्रसार माध्यमांवर येऊ लागले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर हे गाव तसं पाहता डोंगर उतारावरील गाव. यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी डोंगर दऱ्यातून थेट खाली वाहून जात असल्याने नद्यांमध्ये जास्त प्रमाणात पाणी शिल्लक राहत नाही. मुंबई पाणी पुरवणारे धरण इथचं आहे. पण या शहापूरला मात्र त्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने दरवर्षी या गावाला पाणीबाणीला तोंड द्यावे लागते. यामुळे महिलांना डोक्यावर हंडा घेऊन हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते.
राज्यात उष्णतेची लाट पसरली असल्याने नागरिकांना ऊन सहाय्य होत नाही. पण या गावातील महिलांना लहान मुलांना मात्र ऊन्हाचा झळा सोसत पाणी भर हंड्यासाठी फिरावे लागते. नायतर पाण्याच्या टँकरकडे डोळे लावून बसावे लागते.
राज्याच्या बहुतांश भागात पाणीटंचाई
राज्यभरात दुष्काळाची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे नागरिक चिंतेत आहेत. राज्यातील जवळपास ११ हजारांपेक्षा जास्त वाड्या वस्त्यांवर पाणीटंचाईची झळ बसत आहे. तर राज्यातील २५ जिल्ह्यांतील नागरिकांना पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. तर ३ हजार ७०० हून अधिक टँकरनं या दुष्काळी भागात नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्यावर्षी १ हजार ३०० गावांना फक्त ३०५ टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता.
Published on: 01 June 2024, 11:47 IST