अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात गत तीन वर्षांमध्ये जलसंवर्धनाचे पथदर्शी कार्य झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या महामार्ग व जलसंधारण कामांच्या सांगड योजनेतून विद्यापीठाच्या परिसरामध्ये १४ शेततलावांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे विद्यापीठ परिसर पाणीदार झाला. जवळच्या गावांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली. या प्रकल्पामुळे कृषी संशोधनासह बीजोत्पादनाला चांगलाच लाभ होत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसोबत परिसरातील जलसंधारणाची कामे संबंधित कंत्राटदारांकडून करून घेण्याची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१५ मध्ये मांडली होती. कंत्राटदारांनी पाच कि.मी.च्या परिसरातील शेततळे, तलाव, नाला, नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, पुनरुज्जीवन मोफत करून त्यातून निघणारा मुरूम, माती, गाळ महामार्गाच्या कामात वापरण्याची परवानगी राहील, असा निर्णय घेण्यात आला. कंत्राटदारांना कामाच्या जवळच गौणखनिज उपलब्ध झाल्याने महामार्गाच्या कामाची गती वाढली.
या योजनेमुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परिसरात सिंचनाची मोठी व्यवस्था निर्माण झाली. कृषी विद्यापीठाने योजनेचा लाभ घेत परिसरामध्ये महामार्गाच्या कंत्राटदारांकडून मोफत तलाव खोदून घेतले. जलसंधारणाच्या कामामुळे जलसाठय़ांच्या क्षमतेत भरीव वाढ झाल्याचे चित्र आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या समन्वयातून हा अभिनव प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मोठय़ा प्रमाणात गौण खनिजे लागतात. या उपक्रमाच्या माध्यमातून महामार्ग कामालगतच मुरूम, माती, दगड घेण्यात आले. त्या मोबदल्यात विनाखर्च जलसंधारणाची कामे करून देण्यात आली. या कामांसाठी येणाऱ्या खर्चाची बचत झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परिसरात प्रात्यक्षिक क्षेत्र व संशोधन केंद्र अशा दोन भागांत योजनेतून शेततलाव खोदण्यात आले. प्रात्यक्षिक क्षेत्रावर नवीन चार, तर संशोधन केंद्राच्या परिसरात १० शेततलावाची निर्मिती करण्यात आली. अगोदरचे काही तलाव अस्तित्वात आहेत. त्यामुळे आता कृषी विद्यापीठाच्या शेततलावांची संख्या २० वर पोहोचली आहे. नवीन पैकी दोन तलावांच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे.
प्रात्यक्षिक क्षेत्राच्या विविध भागांतील १० शेततळय़ांमध्ये ७३५२५५ क्युबिक मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या माध्यमातून ४४०.५४ हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. संशोधन केंद्रामध्येसुद्धा लहान-मोठे दहा तलाव खोदण्यात आले आहेत. या ठिकाणी पाणी साठवणूक क्षमता ३७१९७१ क्युबिक मीटर आहे. २२३.१८ हेक्टर जमीन सिंचन क्षेत्र तयार झाले.
विद्यापीठाच्या एकूण ६६३.७२ हेक्टर शेतजमिनीला शेततलावामुळे सिंचनाचा लाभ होत आहे. यामध्ये उपलब्धपैकी ६० टक्केच जलसाठा गृहीत धरण्यात आला आहे. उर्वरित ४० टक्के साठा बाष्पीभवन व जमिनीत मुरण्यासाठी सोडण्यात आला, अशी माहिती विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुधीर वडतकर यांनी दिली. कृषी विद्यापीठामध्ये संशोधन व बीजोत्पादनाचे कार्य मोठय़ा प्रमाणात चालते.
हेही वाचा : काय सांगता ! वाळवंटी खजुराची बारामतीत रुजवण; प्रयोगशील शेतकऱ्याने यशस्वी केला प्रयोग
काही वर्षांअगोदपर्यंत पाण्याअभावी हे कार्य प्रभावित झाले होते. दोन्ही हंगामात पीक घेणेदेखील शक्य होत नव्हते. आता शेततळय़ाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले. वरुणराजाने कृपादृष्टी दाखवल्याने जलसाठे भरले आहेत. त्यामुळे संशोधन कार्याला वेळ मिळाला. बीजोत्पादनात भरीव वाढ झाली असे डॉ. वडतकर यांनी सांगितले.
नितीन गडकरींकडून कामाचे कौतुक
योजनेचा लाभ घेत कृषी विद्यापीठाने जलसाठा निर्माण होण्यासाठी अनेक शेततळय़ांची निर्मिती केली. त्याचे फायदे आता समोर येत आहेत. विद्यापीठ परिसरातील सिंचनाचा मोठा प्रश्न सुटला. भूजल पातळीत वाढ होऊन शेतकरी व परिसरातील नागरिकांना लाभ झाला. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामाची दखल घेऊन समाजमाध्यमातून विद्यापीठाचे जाहीर कौतुक केले.
गावांच्या भूजल पातळीत वाढ
कृषी विद्यापीठ परिसरात निर्माण करण्यात आलेल्या शेततळय़ांमुळे परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ झाली. त्याचा फायदा परिसरातील गावांसह शेतकऱ्यांना होत आहे. शिवर, शिवणी, गुडधी, बाभूळगाव, मलकापूर, बोरगाव, वणीरंभापूर आदी गावांतील पाणीपातळीत मोठी वाढ झाली.
सांगड योजनेतून कृषी विद्यापीठ परिसरात अनेक शेततलाव निर्माण करण्यात आले. या तलावांमुळे विद्यापीठाचा सिंचनाचा प्रश्न मिटला असून संशोधन व बीजोत्पादन कार्याला गती मिळाली आहे. – डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबतच जलसंधारणाचे व्यापक कार्य झाले. महामार्गाच्या कामाला लगतच गौणखनिज उपलब्ध झाले. त्या मोबदल्यात जलसंधारणाची कामे करण्यात आल्याने कृषी विद्यापीठात मोठय़ा प्रमाणात जलसाठा निर्माण झाला. – विलास ब्राह्मणकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती.
Published on: 16 October 2021, 09:18 IST