राज्यात पोषक हवामान तयार झाले असून मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. आज आणि उद्या राज्यातील बहुतांशा भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
यानुसार 15 ते 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खरंतर जून महिन्यात ओढ घेतलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. आज (15 जुलै) आणि उद्या (16 जुलै) मुंबई, ठाणे पालघर, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसाच्या दीर्घकालीन विस्तारित पूर्वानुमानानुसार दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होणार आहे. मात्र, इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे.
Published on: 15 July 2020, 12:20 IST