राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. यात आता बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी तीव्रतेचे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्याची तीव्रता कमी असली तरी दोन ते तीन दिवस राज्यातील काही ठिकाणी हलका ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तीन ते चार दिवसांपुर्वी पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्री वादळामध्ये रुपांतर झाल्याने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावरुन जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यातही काही प्रमाणात वेगाने वादळी वारे वाहत होते. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला असून अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडला. चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाच्या उत्तर किनारपट्टीजवळ येताना त्याचा वेग ताशी ५५-६५ किलोमीटर ते जास्तीत- जास्त ७५ किलोमीटरपर्यंत होता. काकिनाडापासून आग्नेयेकडे १५ किलोमीटर, तेलंगणातील खम्मनपासून आग्नेयेकडे २०० किलोमीटर अंतरावर होते.
आंध्र प्रदेश व तेलगंणा या भागातून हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले होते. त्यातच अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. दरम्यान राज्यात सध्या परतीच्या पावसाला माघार घेण्यासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता असून येत्या चार दिवसात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या मॉन्सूनची राज्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान राहील.दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात काही अंशी ढगाळ हवामान राहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
Published on: 14 October 2020, 09:45 IST