मध्यप्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असल्याने राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान आहे. येत्या रविवारपर्यंत कोकण आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस मराठावाडा व मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात हलक्या सरी बरसतील. कोकण विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. घाटमाथ्यावरही जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. गुरुवारी व शुक्रवारी मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने सुत्रांनी वर्तविला आहे. बंगालचा नैऋत्य भाग आणि तामिळनाडू या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे. उत्तर प्रदेशाचा नैऋत्य भाग ते दक्षिण छत्तीसगड ते मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालच्या उपसागराच्या वायव्ये भागात गुरुवारी पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. कर्नाटक ते लक्षद्वीप यादरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे.
उत्तर भारतात दाखल झालेल्या मॉन्सूनचा आस बिकानेर, सिकर, ग्वाल्हेर, सिधी, देहरी, धनवाद, कलकत्ता ते बंगाल उपसागराच्या ईशान्य भागापर्यंत आहे. हा आस समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. त्यामुळे मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
दरम्यान राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात केली असून मराठावाडा, खानदेशासह, मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात रत्नागिरी येथे सर्वाधिक १८५ मिलीमीटर पाऊस झाला. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक , पुणे, सातारा, सांगली, या जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. मात्र भागातही पावसाने दिलासा दिला. कोल्हापूरमध्ये गगनबावडा येथे ९६ मिलीमीटर पाऊस पडला असून धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यापर्यंत पोचला आहे.
Published on: 12 August 2020, 11:27 IST