मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट, पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर, खामगाव, परिसरात हलका पाऊस झाला. तसेच, औरंगाबादमधील काही गावांत गारपीट झाली.
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चक्क हिवाळ्यात सांगली आणि मिरज शहरात अचानक जोरदार गारांचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिवाळ्यामुळे आधीच वातावरण थंड आहे त्यात पाऊस पडल्याने वातावरणात आणखी गारवा पसरला आहे.परभणी शहरासह तालुक्याच्या काही ठिकाणीही रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तसेच काही भागात गाराही बरसल्या.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने येत्या काही दिवसांत पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. दरम्यान, रात्री दहा-साडेदहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त असून काही ठिकाणी गाराही बरसल्या आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतीतील ज्वारी, गहू, हरबरा हातातोंडाशी आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्यात गोंदिया जिल्ह्यातही अनेक तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊसासह गारांचा पाऊस पडला.यामुळे पिकांना मोठा फटका पडण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
पंढरपुरातही रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. वादळी वारा, विजेचा कडकडाटासह रिमझिम पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, डाळिंब, ज्वारीसह रब्बी पिकाला धोका आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला गारपिटीसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज म्हणजे 18 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊस तर 19 फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्या भागांमध्ये कधी पाऊस?
18 तारखेला म्हणजे आज मध्य-महाराष्ट्रातील खानदेश, नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे आणि काही प्रमाणात गारपिटीची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र, 17 तारखेच्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपिटीची तीव्रता तसेच क्षेत्र कमी होईल. 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील, परंतु हवामानात स्थिरता यायला सुरुवात होईल, आणि 20 तारखेपासून राज्यात हवामान पूर्णपणे स्थिर होईल.
राज्यातील २8 जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, औरंगाबाद, जालना धुळे, जळगाव, या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर, मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, नगर, आणि विदर्भातील नागपूर, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Published on: 18 February 2021, 12:43 IST