परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याकरिता विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी या विस्तार उपक्रमांतर्गत विशेष पिक संरक्षण मोहिम दिनांक 19 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण 56 गावांमध्ये राबविण्यात येते असुन या उपक्रमाचा कृती आराखडा कुलगुरू डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांच्या मार्गदर्शनानुसार व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.
दिनांक 19 सप्टेंबरपासून सुरवात करण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर भेट, छोटे मेळावे, गटचर्चा, प्रशिक्षणे, प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांचे दोन पथक करण्यात येऊन यात कृषीविद्या, किटकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि उद्यानविद्या विभागातील विषय तज्ञांचा समवेश आहे.
या पथकात कृषी विद्यावेत्ता डॉ. यू. एन. आळसे यांच्या नेतृत्वात डॉ. एस. जी. पुरी, डॉ. एम. एस. दडके, डॉ. पी. बी. केदार, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. अे. जी. बडगुजर, डॉ. एस. आर. बरकुले, डॉ. सी. व्ही. अंबाडकर, डॉ. एस. व्ही. पवार, डॉ. आर. एस. जाधव, डॉ. आय. ए. बी. मिर्झा आदींचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत दिनांक 25 सप्टेंबर रोजी विद्यापीठ शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी, यांनी पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर, जैतापूरवाडी, बोरगव्हाण व रामपुरी (खु.) या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, किटकशास्त्रज्ञ, डॉ. अे. जी. बडगुजर, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. अंबाडकर, तालुका कृषी अधिकारी श्री. व्ही. टी. शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते. सदरिल गावांत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी विविध कृषी विषयक समस्याबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.
डॉ. बडगुजर यांनी कपाशीवरील आकस्मिक मर आढळल्यास करावयाच्या उपाययोजने बाबत मार्गदर्शन केले. कपाशीच्या उमळलेल्या झाडांना युरिया अधिक म्युरेट ऑफ पोटॅश प्रत्येकी 150 ग्रॅम व कॉपर ऑक्सीक्लोराईड 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करण्याचा सल्ला दिला. तर कपाशीवर लाल्या विकृती आढळल्यास मॅग्नेशियम सल्फेट 0.2 टक्के (20 ग्रॅम/लिटर) व डीएपी 2.0 टक्के (20 ग्रॅम/लिटर) प्रमाणे दोन फवारण्या करण्याचा सल्ला डॉ. आळसे यांनी दिला.
काही कपाशीवर सध्या फुलकिडे व पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असुन त्यासाठी फेनप्रोपॅथ्रीन 15 टक्के ईसी+पायरी प्रॉक्झीफेन 5 टक्के ईसी 1 मिली/लिटर पाण्यातून साध्या पंपाने फवारण्याचे सुचवले. वनस्पती विकृतीशास्त्रज्ञ डॉ. अंबाडकर यांनी कपाशीवरील अनुजीव जन्य करपा व पानावरील ठिपके रोगाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड अधिक स्ट्रोटोसायक्लीन 2.5 ग्रॅम+1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे यांनी विद्यापीठ आपल्या दारी कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून कृषी विभागाच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली.
Published on: 01 October 2019, 08:06 IST