देशात सध्या पोषण माह उपक्रम राबविला जात असून त्या अंतर्गत देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आदिवासी भागांमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी या उपक्रमांचा आढावा घेतला. आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मुख्यालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून आयोजित या आढावा बैठकीत देशभरातील 23 राज्ये/केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले.
सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून साजरा केला जात असून या महिनाभरात राबवायच्या विविध उपक्रमांचे वेळापत्रक आणि कृती आराखड्याबद्दल या आढावा बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. गट, जिल्हा आणि राज्य स्तरावर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल खांडेकर यांनी समाधान व्यक्त केले. देशातील तळागाळापर्यंत पोषणाचे महत्त्व पोहोचावे यासाठी ग्रामसभांचे आयोजन करण्यावर भर द्यावी, अशी सूचना सचिवांनी केली. या उपक्रमांची माहिती प्रसारमाध्यमांमार्फत प्रसारीत केली जावी, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित लेख वाचण्यासाठी: पोषक आहाराची गरज : राष्ट्रीय पोषण महिना
महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमांमध्ये आदिवासी खाद्य महोत्सव, शेवग्याच्या शेंगांची लागवड, स्वच्छतेविषयक जनजागृती तसेच आदिवासी बालकांमध्ये कुपोषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
पोषण अभियान कार्यक्रमांतर्गत हा राष्ट्रीय पोषण महिना उपक्रम राबविला जात आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या देखरेखीखाली राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात आदिवासींचे हित लक्षात घेत, आदिवासी व्यवहार मंत्रालयही सक्रीय सहभागी आहे.
Published on: 07 September 2018, 10:04 IST