देशातील शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी शासन एक ना अनेक योजना कार्यान्वित करीत असते. शेतीमधून दर्जेदार उत्पादन प्राप्त करता यावे यासाठी अनेक कंपन्या पुढाकार घेत असतात. शेती क्षेत्रात नवनवीन आविष्कार घडवून आणीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत करता यावी या अनुषंगाने कार्य करीत असतात.
इंडियन फार्मर फर्टीलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड अर्थात इफको देखील शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत व्हावी या अनुषंगाने गेल्या अनेक दशकांपासून कार्य करीत आहे. या कंपनीने युरिया या खतासाठी एक पर्याय म्हणुन विद्राव्य युरिया अर्थात नॅनो युरियाची निर्मिती केली आहे. इफकोने नुकताच दावा केला आहे की नॅनो युरियायाच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी भरघोस वाढ होत आहे. इफकोच्या मते नॅनो युरियाचा वापर केल्याने शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात बचत होते शिवाय यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळत आहे. इफकोने याबाबत एक सर्वे केला असून या सर्वेत असे आढळून आले की, नॅनो युरियाचा वापर केल्यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात एकरी दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
इफकोचे व्यवस्थापकीय संचालक यूएस अवस्थी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, लवकरच नॅनो डीएपी तसेच इतर नॅनो उत्पादनेही इफको शेतकरी बांधवांसाठी बाजारात उपलब्ध करून देत आहे. त्यांनी नॅनो युरियाचे फायदे बोलून दाखवताना सांगितले की, नॅनो यूरिया लिक्विडने केवळ पर्यावरणीय आणि मानवी आरोग्याच्या समस्या कमी केल्या नसून अन्न सुरक्षा आणि उत्पादकतेतही लक्षणीय सुधारणा केली आहे.
अवस्थी म्हणाले की, इफ्कोने जगातील पहिले नॅनो युरिया व्यावसायिकदृष्ट्या विकसित केले असून, हा या शतकातील एक नवा शोध आहे. नॅनो तंत्रज्ञानाच्या दिशेने इफकोचा हा प्रयत्न खत क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यांनी माहिती दिली की, 2021-22 मध्ये IFFCO ने नॅनो युरियाच्या 2.9 कोटी बाटल्यांचे विक्रमी उत्पादन केले, जे 13.05 लाख मेट्रिक टन पारंपारिक युरियाच्या समतुल्य आहे. नॅनो युरियाच्या 2.15 कोटी बाटल्या विकल्या गेल्या ज्या 9.67 लाख मेट्रिक टन पारंपारिक युरियाच्या समतुल्य आहेत.
निश्चितच इफकोच्या या दाव्यामुळे नॅनो युरियाचा वापर वाढणार आहे. एका प्रतिष्ठित कंपनीने केलेला हा दावा शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारा आहे. यामुळे पर्यावरणीय तसेच मानवी आरोग्याचे रक्षण होत असल्याने भविष्यात याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार आहे. यामुळे मानवी आरोग्याची जोपासना होणारच शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढणार असल्याने याचा फायदा सर्वांनाच होणार. इफकोच्या या दाव्यामुळे निश्चितच नॅनो युरियाचा अजून वापर वाढेल आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता प्राप्त करता येईल.
- संबंधित बातम्या:-
- Banana Farming: केळीची शेती शेतकऱ्यांसाठी ठरू शकते वरदान; जाणून घ्या याविषयी सविस्तर
- अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाने दिली नवसंजिवनी; मिळवलं लाखोंचं उत्पन्न
- ऐकलं का! "या" ठिकाणी दमदार मायलेजची TVS Jupiter स्कूटर मिळतेय फक्त 19 हजार पासून ते 22 हजार पर्यंत; जाणुन घ्या याविषयी
Published on: 03 April 2022, 10:41 IST