कपाशीवर येणाऱ्या बोंडअळीच्या निवारणार्थ फेरोमन सापळे शेतात लावण्याचे आवाहन : जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

Thursday, 02 August 2018 04:16 PM
प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करताना अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करताना अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय

मागील वर्षी कपाशीवर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी आर्थ‍िक विवंचनेत सापडला होता. परंतु बोंडअळीच्या निवारणार्थ कपाशीच्या शेतात फेरोमॅन ट्रॅप लावल्यामुळे नर पतंग त्यांच्याकडे आकर्षित होवून फेरोमॅन ट्रॅप (कामगंध सापळे) अडकतो त्यामुळे कपाशीवर येणाऱ्या बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी होतो. म्हणून बोंड अळीच्या निवारणार्थ फेरोमॅन ट्रॅप कपाशीच्या शेतात लावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

महसुल दिन हा दिन फेरोमन दिन म्हणून साजरा करून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी निवारणार्थ फेरोमन सापळे  लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली. त्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी कापशी येथील विष्णू वडतकर यांच्या कपाशीच्या शेताला भेट देवून गावकऱ्यांना बोंडअळीच्या निवारणार्थ फेरोमन ट्रॅप लावण्याबाबत स्वत: फेरोमन ट्रॅप लावण्याचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडे, तालुका कृषि अधिकारी नरेंद्र शास्त्री, कापशीचे सरपंच अंबादास उमाळेसह शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले की, बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यापुर्वी उपाययोजना म्हणुन फेरोमॅन ट्रॅपचा वापर करावा . यामुळे असलेल्या विशिष्ट प्रकारच्या वासामुळे नर पतंग आकर्षित होतो व ट्रॅपमध्ये अडकतो. एका नर पतंगाचा मादी पतंगाशी संयोग होवून सुमारे ३०० अंडे एकाच वेळी टाकली जातात. संयोगाच्या अगोदरच नर पतंग फेरोमन ट्रॅप मध्ये अडकल्यास या प्रक्रियेला आळा बसतो व अंडी देण्याची प्रक्रिया थांबते. व बोंडअळीचा प्रादुर्भाव होत नाही. असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी रोज सकाळी शेतात जावून फेरोमन ट्रॅपमध्ये किती पतंग अडकले याची पाहणी करावी व ते पतंग नष्ट करावे, अशा सुचना त्यांनी यावेळी देण्यात आल्या. 

बोंडअळीचा प्रादुर्भाव शेतात दिसल्यास कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार किटकनाशकाची फवारणी करावी. या भागातील कृषी सहाय्यक यांनी शेतात जावून फेरोमन ट्रॅप बसविण्याची कार्यवाही येत्या दोन-तीन दिवसांत पुर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी विष्णू वडतकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यावेळी कृषि अधिकारी नरेंद्र शास्त्री यांनी सोयाबीनवर काही ठिकाणी चक्रीभुंगा किड व तंबाखुजन्य अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगितले. श्री. शास्त्री यांनी या किडीबाबत कोणत्या किटकनाशकाची फवारणी करावी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कापशी गावच्या कृषी सहाय्यक अभया राऊत, तलाठी वंदना चौधरी, ग्रामसेवक मधुशिला डोंगरे, मंडळ अधिकारी सुरेश शिरसाठ, गोरेगाव बु. तलाठी राहूल शेरेकर, चिखलगावच्या तलाठी स्वाती माळवे, माझोडच्या तलाठी ज्योती कराडे, गोरेगावच्या तलाठी आर.एच. घुगेसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.