सध्या दहा रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, याचे कारण म्हणजे अनेक ठिकाणी हे नाणे चलनात असताना देखील स्वीकारले जात नाही, यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे असताना हे नाणे नाकारल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पुणे जिल्ह्यातील भवानीनगर येथील बँकेला चांगलाच दणका दिला आहे. यामुळे बँकेने ही नाणी स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. बँकेतच ही नाणी स्वीकारली जात नसल्याने अनेकांनी याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी याबाबत स्वता बँकेत जाऊन विचारणा केली होती.
याबाबत माहिती अशी की दिलीप निंबाळकर यांनी स्वतः दहा रुपयांचे शंभर नाणे (कॉइन) आपल्या खात्यात जमा करण्यासाठी गेले असता तेथील कॅशियर, व महिला अधिकाऱ्यांनी हे नाणे आम्ही स्वीकारत नाही, असे म्हणत भारतीय चलन नाकारले. त्यावरून दिलीप निंबाळकर यांनी थेट भवानीनगर पोलिस स्टेशन गाठत बँकेतील अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचेकडे रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी बँकेशी संपर्क साधून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावले असता बँकेच्या संबधीत महिला अधिकाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेत यापुढे आम्ही दहा रुपयांची नाणी स्वीकारू असे सांगितले.
असे असले तरी मात्र या अधिकाऱ्यांनी स्वतः दहा रुपयांची नाणी घेणे नाकारले की त्यांना वरिष्ठांच्या तशा सूचना होत्या, ग्राहक बँकेतुन पैसे काढायला गेल्यास त्याला दहा रुपयांची नाणी बँक देते मग ग्राहकाकडुन ही नाणी का स्वीकारत नाही, असा सवाल करत ग्राहक पंचायतीने आता संबंधित बँकेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या राज्य प्रबंधकांकडे तशी तक्रार दाखल केली आहे. यावेळी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख विजय शिरसट, सरपंच यशवंत पाटील, ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष किशोर भोईटे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव, ग्राहक पंचायतीचे भारत विठ्ठलदास, वैभव निंबाळकर, दिपक नेवसे, दिलीप दुपारगुडे उपस्थीत होते.
येथील युनियन बँक ऑफ इंडीया शाखा काटेवाडी भवानीनगर भारतीय चलन असलेले दहा रुपयांचे नाणे स्वीकारत नसल्याने येथील व्यापार पेठेवर मोठा परिणाम होत आहे, यामुळे राज्यात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना यामुळे अनेकदा वाद देखील निर्माण होत आहे. यामुळे असे प्रकार कुठे घडत असतील तर थेट पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रार करण्याचे आवाहन ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत भारतीय चलन नाकारणे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे. या बाबतीत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी असून त्यांनी सर्व सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना त्वरित आदेश देऊन दहा रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत. तसेच भारतीय चलन नाकारणाऱ्या अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी देखील केली जात आहे.
Published on: 21 January 2022, 11:32 IST