News

मराठवाड्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर का होतंय हे विचारू नका. पण असं एकही गाव सापडणार नाही, ज्या गावातून पोटा-पाण्यासाठी, मजुरीसाठी स्थलांतर नाही. शेतमजूर, उसतोड कामगार, बिगारी काम, असंघटीत क्षेत्र, पुरवठा असे कितीतरी क्षेत्र सांगता येतील त्यात मराठवाड्यातील मजूर मजुरी करून पोट भरत आहेत.

Updated on 22 December, 2023 3:55 PM IST

डॉ.सोमिनाथ घोळवे

Rural Story : आज सकाळी एका कामानिमिताने घोटावडे फाट्यावर (पिरंगुट) गेलो होतो. काम संपल्यावर नाका कामगारजवळ (मजूर अड्डावर) थोडंस थांबलो. तर लगेच अंदाजे 30 वर्षाचा तरुण येऊन म्हणाला. " साहेब काही काम असेल तर द्या, जे काम असेल ते करतो" मी थोडसं शांत झालो, विचार करायला लागलो. म्हणालो, "काम काही माझ्याकडे नाही. पण बोलण्यावरून मराठवाड्यातील आहात असे वाटते, त्यामुळं आपण थोडसं बोलूया. त्यावर तो तरुण मला म्हणाला "हो".

थोडी चर्चा झाल्यावर नाव आणि गावाची विचारपूस झाली असता, तो मराठवाड्यातील निघाला जालना जिल्ह्यातील खेडेगाव येखील निघाला. मी नेहमी म्हणत असतो. " मराठवाडा मजुर उत्पादक विभाग आहे. गरीब कुटुंबात जन्माला येणारं बाळ पुढे मजूर बनते. यास एखाद्या-दुसरा आपवाद निघतो. राज्याच्या शहरी आणि औद्योगिक विकासासाठी लागणाऱ्या श्रमाला मराठवाड्यातील मजूरांचा हातभार असतो. सर्व क्षेत्रातील (संघटीत, असंघटीत, सेवा, उद्योग, व्यवसायिक, व्यापारी व इतर) मजुरांचा पुरवठा हा मराठवाडयातूनच होतो." या वाक्याचा प्रत्यय लगेच आला.

मराठवाड्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर का होतंय हे विचारू नका. पण असं एकही गाव सापडणार नाही, ज्या गावातून पोटा-पाण्यासाठी, मजुरीसाठी स्थलांतर नाही. शेतमजूर, उसतोड कामगार, बिगारी काम, असंघटीत क्षेत्र, पुरवठा असे कितीतरी क्षेत्र सांगता येतील त्यात मराठवाड्यातील मजूर मजुरी करून पोट भरत आहेत.

पुढे तरुणाला विचारले, "शिक्षण काय झाले" असे विचारले. त्यावर तरुण म्हणाला. "एम.ए" झाले आहे". पुढं म्हणालो, पीएचडीला प्रवेश का घेतला नाही. सरकारची शिष्यवृत्ती मिळाली असते. त्यामुळे असे बिगारी काम करावे लागले नसते" तो तरुण म्हणाला, "जालन्याला एमए झाले आहे. बीए घरीहून झालं आणि एमएम पण घरीहून झालं. फक्त परीक्षेला गेलो होतो. कसलं शिक्षण!!. शिक्षण जर चांगलं मिळालं असतं. तर आज अशी बिगारी काम शोधण्याची वेळ आली नसती. बीएला असताना सुरुवातीला कॉलेजला गेलो होतो , पण तासच होत नव्हते. हळूहळू कॉलेजला जाणे बंद केले. पुढे कॉलेजला जाऊ वाटेना. झालं घरीहून शिक्षण सुरू. एमएला काही दिवस कॉलेजला जात होतो. मुलं येत नव्हते, म्हणून प्राध्यापक देखील येत नव्हते.

कॉलेजला प्राध्यापक येऊन ऑफिसमध्ये बसून रहात होते. सकाळी आम्ही कॉलेजमध्ये तर आमचे प्राध्यापक 10/11 वाजताच हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर असतं. किंवा इतर कोठेतरी असतं. 11 वाजता कॉलेजमध्ये प्राध्यापक दिसतो का?. जाऊन शोधा. कुठले तास आणि कसले तास?. त्यामुळं काय कॉलेजला जाऊन कराव. घरीच थोडाफार काम करत होतो. घरची 5 एकर शेती आहे, पाणी नाही. कुटुंबातील चार माणसंच पोट पाच एकरवर भरत नाही. घराबाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. आता काय करावं हेच सुचत नाही.

मनात आले, शिक्षण कसलंही घेतलं तरीही नौकरी मिळते असे राहिले नाही. रोजगार असो की नौकरी असो तुम्हाला ओळख किंवा गॉड फादर लागतो. हे दोन्ही नसेल तर अशी समोरच्या तरुणासारखी अवस्था होते. या तरुणाला दोष देता येत नाही. कारण तेथील समाज-आर्थिक आणि राजकीय व्यवस्थाच तशी बनवली गेली आहे. अलीकडे पूर्ण आश्रित व्यवस्था झाली आहे. या समाज व्यवस्थेच्या प्रवाहात टिकायचे असेल तर प्रवाहाप्रमाणे चालावं लागतं. पण ही हिंमत आता खूप कमी तरुणांमध्ये आहे. प्रवाहाच्या विरोधात चालणं आता शक्य नाही अशी अवस्था तरुणांची झालेली दिसून येते. एकंदर खूपच हतबल झालेला तरुण दिसून आला. त्यावर मी म्हणालो "आता काय करत आहात"? त्यावर तरुण म्हणाला, "काही नाही"

त्यावर म्हणालो "ग्रामीण भागातून इथं आलात तर काहीतरी करण्याचे उद्देश-ध्येय ठेवून आला असाल ना"?. त्यावर तो तरुण म्हणाला, "हो आलो होतो. मिळेल ती नौकरी करायची. पण मिळत नाही. आता काहीच मार्ग दिसतं नाही. आमच्यात अनौपचारिक बरीच चर्चा झाली. चर्चेतून बरेच बारकावे समजून घेता आले. शिवाय बेरोजगारीचे वास्तव देखील समजून घेता आले.

उच्च शिक्षण घेतलेला, पण रोजगाराच्या शोधात गेल्या चार वर्षांपासून चालू आहे. ३२ वर्षाचा, लग्न न झालेला, (जात विचारली पण नोंदवणार नाही) हा तरुण अतिशय साधा होता. राहणीमान देखील साधं होत. बोलण्यात हुशार होता. घरची परिस्थिती फारच हालाक्याची होती. तसेच राजकीय नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी, किंवा उद्योगपती अशा मोठ्या व्यक्तीचे काहीच कोणाशी संबंध नव्हता. पण अलीकडे हा तरुण हळूहळू राजकीय नेतृत्वाच्या संपर्कात गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येऊ लागला. त्यास रोजगार शोधण्याऐवजी राजकीय नेतृत्वाची गावातील काहीजणां बरोबर चांगले वाटू लागले होते. गावातील गावगुंड आणि राजकीय कार्यकर्ते यांच्याबरोबर बाहेर दोन-चार वेळा जाणं झालं होतं. त्यामुळे आई-वडिलांना वाटले असेच चालू राहिले तर पोरग बिघडेल, पुन्हा हातात राहणार नाही. म्हणून घरच्यांनी त्याला शहरात मजुरी-रोजगार करून चार पैसे कमव असे म्हणत, घराबाहेर काढलं.

कोठे काय करायचे, असे मनात विचार येवून हा तरुण गावातील काहीजण पिरंगुट परिसरात होते त्यांच्याकडे आला. गावातील माणसांकडे काही काम नसल्याने "मजूर अड्ड्यावर" कोण काही काम देतय का हे पाहण्यासठी उभा राहिलेला होता. नुकताच गावाकडून आल्याने ओळखी नसल्याने काम मिळत नव्हते. गेल्या आठवड्यात दोनच दिवस काम मिळाले होते. बिगारी-असंघटीत क्षेत्रातील काम नवीन असल्याने कंत्राटदार/ गुत्तेदार त्यास काम देत नव्हते. दुसरे, बिगारी कामाचे कौशल्य, क्षमता आणि अनुभव कमी असल्याने फारसे काम मिळत नव्हते. आगदी निराश होवून हा तरून मजूर अड्ड्यावर उभा होता.

एकंदर या तरुणाबरोबर चर्चा झाल्यानंतर घरी येताना मनातील मनात वाटू लागले की, या वाढत्या बेरोजगारीला राजकीय व्यवस्था, सरकार, शिक्षण व्यवस्था आणि समाजव्यवस्था हे प्रमुख घटक जबाबदार आहेत. तसेच दिवसेंदिवस वाढत्या बेरोजगारीचे वास्तव खूपच गंभीर होत असल्याची जाणीव देखील झाली.

(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ई-मेल - sominath.gholwe@gmail.com

English Summary: Unemployment Problem Who is really responsible for the increasing unemployment
Published on: 22 December 2023, 03:55 IST