लॉकडाऊनच्या कालावधीत दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे राज्यात अतिरिक्त दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्याची राबविण्यात येत आहे. या योजनेला दोन महिन्यांची म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने या महिन्यात राज्यातील पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भूकटी देण्याचा निर्णय यापुर्वीच घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लिटर दुधाचे रुपांतर भुकटीत करण्याचा योजनेलाही एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला होता.
दरम्यान शासनाने एप्रिल २०२० पासून प्रतिदिन अतिरिक्त ठरणाऱ्या दुधापैकी १० लाख लिटर दुधाचे रुपांतर दूध भुकटीत करण्याची योजना सुरु केली. ही योजना एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी राबविण्यात आली. त्यानंतर या योजनेस वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. पण राज्यातील अतिरिक्त दुधाची परिस्थिती अद्यापही सुधारलेली नाही. तसेच राज्यात दूध दरवाडीवरुन राज्यात आंदोलनेही झाली. दुधाच्या दरवाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष अजूनही आक्रमक आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस आता आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारने कोरोोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन घोषित केला होता. राज्यानेही १९ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन लागू केला होता. या काळात बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली.
Published on: 28 August 2020, 01:44 IST