जागतिक अन्न दिनानिमित्त दिवंगत हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांना कृषी जागरणकडून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जागतिक प्रख्यात कृषी तज्ज्ञ देखील उपस्थित होते.
आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ.एम.एस.स्वामीनाथन श्रध्दांजली वाहून करण्यात आली. त्यानंतर कृषी जागरणच्या वतीने डॉ एम एस स्वामिनाथन यांना आदरांजली वाहणारा व्हिडिओ सादर केला. त्यात त्यांचे गौरवशाली जीवन,अग्रगण्य कार्य आणि अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेती पद्धतींबाबतची त्यांची अतूट बांधिलकी दाखवण्यात आली.
कृषी जागरणचे संस्थापक आणि मुख्य संपादक एम. सी. डॉमिनिक आणि व्यवस्थापकीय संचालिका शायनी डॉमिनिक यांनी डॉ. स्वामीनाथन यांना आदरांजली वाहिली. तसेच भारतीय कृषी क्षेत्रात हरित क्रांतीची परिवर्तनात्मक चळवळ सुरू करण्यासाठी त्यांनी दिलेल्या सखोल योगदानाबद्दल व्यापक कृतज्ञता व्यक्त केली.
श्रद्धांजली समारंभात जमलेले प्रमुख कृषी तज्ज्ञ डॉ.त्रिलोचन महापात्रा - अध्यक्ष, वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरण, श्री राजू कपूर- सार्वजनिक आणि उद्योग व्यवहार संचालक FMC कॉर्पोरेशन,डॉ मोनी एम - माजी महासंचालक,राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, डॉ व्ही. सदामते - माजी सल्लागार कृषी भारत सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तरुण श्रीधर-माजी केंद्रीय सचिव,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग यांनी डॉ. एमएस स्वामीनाथन यांचा सन्मान करणारा समर्पित लेख वाचला. डॉ. मालविका ददलानी - माजी सहसंचालक, संशोधन आणि प्रमुख, बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, IARI, यांनी स्वामिनाथन सरांनी त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने लिहिलेले पत्र मोठ्याने वाचून दाखवले ज्यात त्यांच्या व्यावसायिक प्रवासावर डॉ. स्वामीनाथन यांच्या मार्गदर्शनाचा कायमस्वरूपी प्रभाव चित्रित केला आहे.
याचबरोबर डॉ.सौम्या स्वामीनाथन झूम कॉलद्वारे श्रद्धांजली समारंभात सामील झाल्या होत्या. यावेळी त्यांनी या प्रसंगाचे महत्त्व पटवून देत स्वामीनाथन यांच्या कठोर परिश्रमाने कृषी क्षेत्राचे किती रूपांतर झाले आणि लाखो लोकांसाठी अन्नसुरक्षा सुनिश्चित केली हे वर्णन केले.
श्रद्धांजली सभेत बोलताना डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, माझ्या वडिलांना नेहमीच शेतकऱ्यांची काळजी होती. हरितक्रांती आपण साध्य केली आहे. तथापि, ते म्हणाले की पौष्टिक सुरक्षा आणि पौष्टिक अन्नाची सुरक्षा साधली गेली पाहिजे. एक डॉक्टर म्हणून मी देखील वडिलांच्या या संदेशाशी सहमत आहे. आयुष्याच्या संधिकालातही ते शेतकरी आणि देशातील जनतेबद्दल बोलत असत. त्यांनी दिलेले हे संदेशांवर अंमल करणे ही आमची जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.
तसेच कृषी जागरणच्या ऑक्टोबर आवृत्तीच्या मासिकाचे अनावरणाने या समारंभाचा समारोप झाला, ज्याच्या मुखपृष्ठावर डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचे छायाचित्र होते. यावेळी स्वामीनाथन यांच्यावर कृषी जागरणने तयार केलेल्या इंग्रजी, तमिळ आणि मल्याळम भाषेतील मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
Published on: 17 October 2023, 06:54 IST