ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील कातकरी या आदिवासी जमातीसाठी काम करणाऱ्या आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थेने मोठं-मोठे औषध कंपन्यांना गुळवेलचा पुरवठा करून कोट्यावधीची उलाढाल केली आहे. कोरोनामुळे अख्ख्या जगावर आपत्ती आलेली असताना संधीचे सोने करण्याची किमया या संस्थेने साधली आहे.
आतापर्यंत या संस्थेने जवळ जवळ 1 कोटी 51 लाख रुपये किमतीचे गुळवेल औषध कंपन्यांना पुरवली आहे. या कंपन्यांमध्ये साधारणतः डाबर, वैद्यनाथ आणि हिमालयासारख्या कंपन्यांचा समावेश आहे. एकटी हिमालया कंपनीला या संस्थेने जवळजवळ शंभर टन गूळ वेल पुरवला आहे. कातकरी या आदिवासी समाजातील सुनिल पवार नावाच्या 27 वर्षाच्या युवकाने आपल्या दहा-बारा मित्रांसोबत त्याच्या मूळ गावी महसूल कार्यालय समोर समाजातल्या लोकांना मदत करण्यास सुरुवात केली व या माध्यमातून एकात्मिक सामाजिक संस्थेचा उगम झाला. या संस्थेचे जवळ-जवळ 51 सभासद असून आदिवासी बांधवांकडून या संस्थेला जवळजवळ अठराशे लोकांकडून गुळवेलचा पुरवठा होतो.
केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ या संस्थेने सुनील पवार यांना जेव्हा जेव्हा मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा मदतीचा हात देत जवळजवळ पंचवीस लाख रुपयांची मदत केली.या भागामध्ये जवळजवळ गुळवेल प्रक्रियेचे सहा केंद्रे आहेत. या प्रत्येकी केंद्राला भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने प्रत्येकी पाच लाख रुपये एवढी मदत केली. जर गुळवेलचा औषधी गुणधर्मांचा विचार केला तर, मलेरिया तसेच विषाणूजन्य ताप यावर गुळवेल लाभकारी आहे.
डायबिटीस वर देखील हे प्रभावी औषध मानले जाते. गुळवेल चा अर्क, भुकटी किंवा त्याचा गर औषधी म्हणून वापरला जातो. या संस्थेच्या माध्यमातून सुनिल पवार यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून लॉक डाउन काळातही जवळजवळ अठराशे आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे साधन मिळाले.
Published on: 26 May 2021, 10:41 IST