मुंबई: वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा, वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी, जनतेला वनीकरणाचे महत्त्व पटवून देता यावे, या हेतूने राज्यात 15 जून ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वन महोत्सवाच्या काळात वनविभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येतील अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान
वनमंत्री श्री. राठोड पुढे म्हणाले,राज्यात सुरु असलेला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यापुढेही चालू राहावा म्हणून ‘वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत खाजगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा क्षेत्रात सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्वसाधारण कालावधीत 9 महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप) 15 रुपयांना तर 18 महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे 75 रुपयांना एक याप्रमाणे देण्यात येते. परंतु या वनमहोत्सवाच्या काळात 9 महिन्यांचे रोप केवळ 8 रुपयांना तर 18 महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप 40 रुपयांना एक याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
राज्यात वन महोत्सवाच्या काळात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व आस्थापना तसेच निमशासकीय यंत्रणा व लोकांचा मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेण्यात येणार आहे. ज्या शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे अशा यंत्रणांना रोपनिर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल. यासाठी त्यांनी, लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी लगतचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण यांचेकडे पत्राद्वारे करावी. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन वनेत्तर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन वनमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
Published on: 19 June 2020, 07:29 IST