News

मुंबई: शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात 10 वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेअंतर्गत राज्यात 2018 च्या पावसाळ्यात 2 हजार 177 मुलींच्या जन्मानंतर 21 हजार 770 रोपांची लागवड झाली आणि रोप लावून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

Updated on 15 January, 2019 9:27 AM IST


मुंबई:
शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात 10 वृक्षांची लागवड करायची असा संस्कार वन विभागाने “कन्या वन समृद्धी योजने”अंतर्गत घालून दिला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या योजनेने शेतकऱ्यांच्या लेकीचे तिच्या नावाने लावल्या जाणाऱ्या झाडाशी असलेले नाते अधिक दृढ केले. योजनेअंतर्गत राज्यात 2018 च्या पावसाळ्यात 2 हजार 177 मुलींच्या जन्मानंतर 21 हजार 770 रोपांची लागवड झाली आणि रोप लावून त्या मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याची एक अनोखी परंपरा राज्यात रुजली.

पुणे विभागाने यात आघाडी घेतली असून 2018 च्या पावसाळ्यात 971 मुलींच्या जन्मानंतर तिथे सर्वाधिक 9 हजार 710 रोपांचे वाटप करण्यात आले. त्या पाठोपाठ नागपूरचा नंबर लागतो येथे 674 मुलींच्या जन्मानंतर 6 हजार 740 रोपांचे वितरण योजनेअंतर्गत करण्यात आले. अमरावतीमध्ये 438 मुलींच्या जन्मानंतर योजनेतून 4 हजार 380 झाडे लागली. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांनी योजनेतून शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे झाडांचे वितरण केले आहे. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला येते, त्या शेतकरी कुटुंबाने पुढे येत या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याची आवश्यकता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

योजनेतून मिळतात ही 10 झाडे...

वाढत्या जागतिक तापमानाचे धोके कमी करायचे असतील तर राज्यात वृक्षाच्छादन वाढावे, सध्याचे 20 टक्क्यांचे हरित क्षेत्र राष्ट्रीय वननीतीनुसार 33 टक्क्यांपर्यंत जावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वन विभाग काम करीत आहे. कन्या वन समृद्धी योजनेचे बीजही याच विचारातून रुजले आहे. योजनेमध्ये ज्या शेतकरी दाम्पत्याच्या घरी मुलगी जन्माला येईल, त्यांना वन विभागाकडून पाच सागाची तर पाच फळझाडाची रोपे प्रोत्साहन म्हणून दिली जातात. 5 सागाच्या रोपांशिवाय दिल्या जाणाऱ्या फळझाडांच्या रोपांमध्ये 2 रोपे आंब्याची, 1 रोप फणसाचं, 1 रोप जांभळाचे तर एक रोप चिंचेचं आहे. भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन वृक्षांची निवड करण्यात आली आहे.

विकसित होईल उत्पन्नाचा स्त्रोत

मुलीच्या जन्माबरोबर वृक्ष लावल्यास मुलगी जशी मोठी होईल तसे वृक्षही मोठे होत जातील. तिच्या लग्नापर्यंत हे वृक्ष मोठे झालेले असतील. फळांनी लगडलेले असतील. त्यातून पर्यायी उत्पन्नाचा स्त्रोत देखील विकसित होऊ शकेल. सागाच्या वृक्षांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून तिच्या विवाहाच्या वेळी आवश्यक असणारी पैशांची निकडही भागवता येऊ शकेल अशी प्रतिक्रिया वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

असा घ्यायचा योजनेचा लाभ

शेतकरी कुटुंबात जन्‍म झालेल्‍या मुलीच्‍या पालकांनी मुलीचा जन्‍म झाल्‍यानंतर संबंधित ग्रामपंचायतीच्‍या ठिकाणी मुलीच्‍या नावाची नोंद करावयाची आहे. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्‍यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावयाचा आहे.

वृक्षलागवड मोहिमेत असंही जोडलं गेलं लेकीचं वृक्षांशी नातं...

वन विभागाने सुरुवातीला वृक्षलागवडीत लेकीचं नातं अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला तो 'माहेरची झाडी' या उपक्रमातून. सासरी जाणाऱ्या लेकीची आठवण म्हणून तिच्या हाताने माहेरच्या अंगणात विविध फळझाडांचे वृक्ष लावण्याचा संस्कार महाराष्ट्रात रुजला. 13 कोटी वृक्षलागवडीत अनेक ठिकाणी सासरी जाणाऱ्या लेकीच्या नावे 'माहेरची झाडी' लागली. अंगणात बहरणारं लेकीचं झाडं पाहून सासरीही आपली मुलगी अशीच आनंदी असल्याचे समाधान आई-वडिलांना मिळू लागलं...

सुरक्षित पर्यावरणासाठी

राज्यातील जैवविविधता जपताना भावी पिढीसाठी सुरक्षित पर्यावरण हाती देण्याचा प्रयत्न यातून पूर्णत्वाला जाण्यास मदत होणार आहे. नव्याने उमलणाऱ्या पिढीत आपल्या नावे लागलेल्या वृक्षांप्रती आवड निर्माण झाल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण वाढेल, पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड आणि वृक्ष संगोपनाची भावना त्यांच्यामध्ये वृद्धिंगत होईल, असा विश्वास यातून व्यक्त होत आहे. शिवाय यातून वनश्री तर वाढत आहेच पण शेतकऱ्यांची कन्याही खऱ्या अर्थाने 'धनश्री' ठरत आहे.

English Summary: Tree plantation under the Kanya Van Samruddhi Yojana
Published on: 15 January 2019, 09:15 IST