मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःची मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करावी. त्या प्रणालीची तपासणी जिल्हा उपनिबंधक यांनी करून योग्य मानक कार्यप्रणाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 पासून अशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात आयोजित शेतकरी मालाची खरेदी विक्री समस्यांचे निराकरण बाबतच्या आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव होऊ नये यासाठी प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे. लातूर जिल्हा कोरोनाच्या अनुषंगाने शुन्य आहे व तो शून्यच राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी. प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोनाच्या अनुषंगाने त्यांची मानक कार्यप्रणाली तयार करून घ्यावी. ही कार्यप्रणाली तयार झाल्याशिवाय व त्या प्रणालीची तपासणी झाल्याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्याचे व्यवहार सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पणन महामंडळाने कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू करण्याबाबत दिलेल्या सूचनांचे पालन सर्व संबंधित बाजार समित्या व संबंधित अधिकाऱ्यांनी करावे. जिल्ह्याच्या राज्य व जिल्हा सीमा कडेकोटपणे बंद करून घ्याव्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहनांचे पास डिजिटल पद्धतीने देण्याची व्यवस्था करावी. तसेच समिती या दिवसाला किती वाहने हाताळू शकतात त्या पद्धतीने त्यांनी योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना संदेश देऊन त्यांची ऑनलाइन नोंदणी करावी व त्यांच्या याद्या करून तारखा निहाय त्यांना माल घेऊन येण्यास सुचित करावे व माल आल्यानंतर त्यांचे वेळेत मोजमाप होऊन पेमेंट करण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्यानंतर इतर जिल्ह्यातून व परराज्यातून कृषिमालाच्या वाहनाला पास मिळाला तर ते वाहन त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येण्यास परवानगी असेल. परंतु कोरोनाच्या अनुषंगाने त्या वाहनाचे व वाहनांमधील व्यक्तींचे सॅनिटायजरिंग करण्याची जबाबदारी त्या-त्या बाजार समित्यांची असेल याची नोंद घ्यावी अशी सूचना पालकमंत्री देशमुख यांनी केली. सामाजिक अंतर हे लॉकडाऊन कालावधी पुरते न पाळता तो आपल्या जीवनशैलीचा भाग म्हणून स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
बाजार समिती सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणच्या सुरक्षेबाबतची सर्व व्यवस्था त्यांनीच अधिक सक्षमपणे पार पाडणे आवश्यक आहे. याबाबतचा अतिरिक्त ताण पोलिस यंत्रणेवर येणार नाही याचीही योग्य ती काळजी बाजार समितीने घ्यावी असे श्री. देशमुख यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा उपनिबंधक सामुर्त जाधव, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील निलंगेकर, जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मन्मथ किडे यांच्यासह इतर सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव उपस्थित होते.
Published on: 20 April 2020, 10:04 IST