मुंबई – महाराष्ट्राला नैसर्गिक, ऐतिहासिक, पौराणिक, भौगोलिक असे विविध पर्यटन वैभव लाभले आहे. राज्यात जंगले, पुरातन गडकिल्ले, गुंफा, मंदिरे, समुद्रकिनारे, वन्यजीव असे पर्यटन वैविध्य असून हे जगभरापर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
यातून देशातील आणि जगभरातील पर्यटक महाराष्ट्राकडे आकर्षित होतील आणि त्याद्वारे राज्याचा पर्यटनविकास होऊन रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) विविध उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते आज वर्षा निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार-सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्य डॉ. अनिता मुदलीयार, मेक माय ट्रीपचे हरजित कुमार, स्कायहायचे रुद्र बंधू सोळंकी, हर्षिल कोरिआ आदी मान्यवर उपस्थित होते. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी सुधारीत बुकींग इंजिन तसेच राज्यातील पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. तसेच सिंहगड (जि. पुणे) येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.
Published on: 21 August 2021, 04:39 IST