पुणे
देशातील महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. टोमॅटोने आधीच ग्राहकांच्या डोळ्यात चांगलेच पाणी आणले आहे. त्यातच आता वटाण्याने देखील टोमॅटोच्या पुढचा दर गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. हिरव्या वटाण्याने दरात टोमॅटोला देखील मागे सोडले आहे.
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. जवळपास २०० टक्क्यांनी पालेभाज्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत वाटाणा २४० रुपये किलो, गवार १२० रुपये किलो, आले देखील २४० रुपये किलो झाले आहे. काकडी आधी ३० रुपये होती आता तिचे दर ४० रुपये किलो झालेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पालेभाज्या खाताना विचार करावा लागत आहे.
पालेभाज्यांचे दर वाढल्यामुळे नागरिकांनी खरेदी करण्यात हात आखडता घेतला आहे. जेथे नागरिक किलोने भाज्या नेत होते तेथे ते पावशेर किंवा अर्धा किलोने नेत आहेत. तसंच वाढते दर असल्यामुळे हे दर कधी कमी होतील यांची ग्राहक वाट पाहत आहेत. या पालेभाज्यांच्या वाढत्या दराबाबत सरकारने थोडा विचार करावा, अशी मागणी ग्राहक बाजारातून करत आहेत.
दरम्यान, राज्यात पाऊस सुरु असल्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादन कमी असल्याने पालेभाज्यांचे दर चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना दराचा चांगलाच फायदा झाला आहे. मात्र ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. त्यामुळे दर कमी होण्याचे ग्राहक वाट पाहत आहेत.
Published on: 29 July 2023, 04:47 IST