मुंबई- गेल्या हंगामापेक्षा लागवडीचे वाढते प्रमाण, कोरोनाचे निर्बंध (corona), वाढती आवक या कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर टॉमेटोच्या बाजारभावात घसरण दिसून येत आहे. कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने राज्यातील टॉमेटो(tomato) उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेले टॉमेटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
गेल्या हंगामात सततच्या पावसामुळे लागवडी कमी प्रमाणात होत्या. नैसर्गिक संकटासोबत कीटकांचा प्रादूर्भाव अधिक प्रमाणात होता. त्यामुळे टॉमेटोची लागवड कमी प्रमाणात होती. यंदाच्या हंगामात नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असल्यामुळे टॉमेटो उत्पादक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात लागवड दिसून आली. जून व जुलै महिन्यात विक्रमी आवक झाल्यामुळे टॉमेटोच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली.
राज्यात नगदी उत्पादन देणारे पीक म्हणून टॉमेटोकडे बघितले जाते. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी नगदी पैशाचे पीक म्हणून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. शेतकऱ्यांना अनेकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी, बॅंकेचे कर्ज फेडता येईल या आशेने टोमॅटोची लागवड केली. टोमॅटो, भाजीपाला अगदी कवडीमोल भावात विकण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे.
नगर जिल्ह्यातील बाजारभाव:
नगर जिल्ह्यातही (Nagar District) भाव कमी मिळत आहे. संगमनेरात (Sangamner) 250 ते 400 रूपये, श्रीरामपूरात (Shrirampur) 500 ते 800, राहाता (Rahata) 500 ते 1000, अकोलेत (Akole) 200 ते 1000 रूपये प्रति क्विंटल दर मिळाला.
टॉमेटो भाव घसरणीची प्रमुख कारणे:
-विक्रमी लागवड
-पोषक वातावरणामुळे लागवड
- कोरोना निर्बंधामुळे निर्यातीस फटका
-मागणीच्या तुलनेत आवक वाढ
-खरेदीत घट
Published on: 01 September 2021, 12:46 IST