राज्यात मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, मका, द्राक्षबागा यांसह इतर हाताशी आलेली पिके पावसामुळे वाया गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरुपात कृषी विभागास कळवावे असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पिके जमीनदोस्त झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, वाशिम, नाशिक, नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं आहे. फळबागा, पोल्ट्री फार्म, शेततळे, वाहने, शेड, तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच अजून पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पिकांचे अजुन नुकसान होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तसेच ज्या ठिकाणी नेटवर्क अडचण आहे, त्यांनी लेखी स्वरूपात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन नाशिक जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले. तसेच नुकसानग्रस्त शेतकतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
Published on: 29 November 2023, 12:08 IST