आज मध्य महाराष्ट्र, विदर्भात वादळी पावसाची शक्यता आहे, तर कोकणात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी मॉन्सूनच्या सरी बरसल्याच नाहीत. अनेक ठिकाणी पेरणी झाली असून पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र पावसाने उडीप दिल्याने या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. उन्हाचा चटका देखील वाढला आहे, दरम्यान देशाच्या राजधानीत मॉन्सून प्रवेश केला आहे. बुधवारी काही भागात पाऊस झाला, गुरुवारी म्हणजेच आज पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तराखंड, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगित- बल्टिस्तान आणि मुझफ्फाराबादही मॉन्सूनने व्यापला आहे.
राजस्थानपासून बिहारपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकर वारे वाहत आहेत. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह पाऊस पडणार आहे. तर उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान देशाच्या इतर राज्यात मॉन्सून पोहचला असून तेथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीचे वातावरण आज ढगाळ राहणार आहे. पुढील काही दिवस दिल्ली- एनसीआरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या काही भागात पुढील दोन दिवसात पाऊस होईल असा विश्वास हवामान विभागाने वर्तवला आहे.
Published on: 25 June 2020, 02:28 IST