सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी, बुलडाणा जिल्ह्यात दि. 20 रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चा पार पडला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाही तर 29 नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रविकांत तुपकर बुलढाणा जिल्ह्यातून मुंबईस रवाना झाले आहेत.
तसेच शेतक-यांचे अन्य प्रश्न सुटावेत यासाठी उद्या लाखो शेतक-यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेणार अशी अशी घोषणा शेतकरी नेत रविकांत तुपकर यांनी केली आहे.
पिवळा मोझॅक, बोंड अळी व पावसात खंड पडल्याने सोयाबीन-कापूस व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रतीएकर १० हजार रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ९ हजार व कापसाला किमान १२ हजार ५०० रुपयांचा भाव गरजेचा आहे. शासनानं कोणतीही अट न ठेवता संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशीही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. यासंदर्भात सरकारनं आठ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा २९ नोव्हेंबरला आम्ही मंत्रालय ताब्यात घेऊ, असा इशारा तुपकरांनी दिला. मात्र अजूनही या मागण्या मान्य न झाल्याने उद्या रविकांत तुपकर लाखो शेतकऱ्यांसमवेत मंत्रालयाचा ताबा घेणार आहेत.
दरम्यान, बुलडाणा पोलीसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली होती. अटके नंतरही तुपकर त्यांच्या मागण्यांवर ठाम असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सोमठाणा येथे तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. तसेच महाएल्गार मोर्चाच्या वेळी दिलेल्या घोषणेनुसार आज रविकांत तुपकर मुंबईला जाण्यासाठी रवाना झाले आहेत. बुलढाणा -सिल्लोड - संभाजीनगर - नगर - चाकण मार्गे लोणावळा या मार्गे ते मुंबईला जाणार आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकरांनी मांडली आहे. त्याप्रमाणे उद्या दि २९ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर हजारो शेतक-यांसमवेत मुंबईतील मंत्रालयाकडे कूच करतील.
Published on: 28 November 2023, 01:48 IST