News

मुंबई: राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Updated on 20 April, 2020 10:17 AM IST


मुंबई:
 
राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.

बऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत,  अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही  अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण  मोठ्यासंख्येने  बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा

कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यांच्या सीमा बंद

जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे  दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. 3 मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीसही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वृत्तपत्रांबाबत

वृत्तपत्रांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील परंतू घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही. मुंबई पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल.

अत्याचारग्रस्त महिलांनी 100 नंबरवर फोन करावा

राज्यातील जनतेने आतापर्यंत अतिशय संयम, जिद्द आणि धैर्य दाखवून या संकटाचा सामना केला आहे, त्यांचे मी आभार मानतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, खूप काळ घरी राहिल्याने मानसिकस्थिती थोडीफार इकडे तिकडे होते परंतू याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन आहे म्हणून पुरुषांनी घरातील महिलांना त्रास द्यावा. महिलांवर घरात अत्याचार होता कामा नयेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दुर्देवाने असा अत्याचार होत असल्यास अशा महिलांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे, पोलीसरुपातील भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील असे सांगितले.

समुपदेशनासाठी दोन सेवा कार्यरत

मानसिक अस्वस्थता वाढली असेल, समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि बिर्ला या संस्थेच्या विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा नंबरही सांगितला. 1800 120 82 0050 असा तो नंबर आहे. याशिवाय आदिवासी विभागाने प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लता यांच्या संयुक्त विद्यमाने एक सेवा सुरु केली असल्याचे व त्याचा नंबर 1800 102 4040 असा असल्याचेही ते म्हणाले.

खाजगी डॉक्टर्सची सेवा नॉन कोविड रुग्णांसाठीच

राज्यातील खाजगी डॉक्टर्सशी आपण तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून त्यांची कोरोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ही रुग्णालये फक्त नॉन कोविड रुग्णांसाठी ज्यांना हृदयरोग, किडनीचे आजार आहेत, मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत त्यांच्या उपचारासाठी आहेत. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनी या दवाखान्यात जाऊ नये, सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करावी.

महाराष्ट्रात काय सुरु आहे

राज्यात जवळपास 67 हजार चाचण्या करण्यात आल्या असून यातील 95 टक्के केसेस निगेटिव्ह आल्या आहेत. साधारणत: 3600 पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ही आकडेवारी काल रात्रीची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात 300 ते 350 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सुखरूप गेले आहेत ही समाधानाची बाब आहे. पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत अशी स्थिती आहे.

52 रुग्ण मध्यम ते अतिगंभीर आहेत. त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ते 84 वर्षांच्या आजीपर्यंत रुग्ण बरे होतांना दिसत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही तर काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत असले तरी कुठल्याही भ्रमात राहण्याची इच्छा नसल्याने याची पुन्हा तपासणी करण्याच्या सुचना आपण दिल्याचेही ते म्हणाले.

अडकलेल्यांना दिला दिलासा

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल असा विश्वास देतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरु असल्याचे सांगितले. यावर लवकरच मार्ग निघेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी सुखरुप पाठवू असा शब्द ही त्यांनी यावेळी दिला.

केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्य

केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य शासन अन्नधान्य वितरित करत आहे केंद्र ही आधारभूत किंमतीने धान्य देण्यास तयार आहे असे सांगतांना केंद्र सरकार मोफत धान्य देते परंतू ते केवळ तांदुळ आहेत आणि त्याचा लाभ फक्त अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तांदुळासोबत गहू आणि डाळीची आपण केंद्रसरकारकडे मागणी केली असल्याचे व ते मिळताच त्याचेही वाटप सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.

English Summary: To start some kind of business the boundaries of the districts will remain closed
Published on: 20 April 2020, 10:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)