मराठवाड्यातील ४ हजार ६९७ प्राथमिक सहकारी दूध संस्थांपैकी जवळपास ३ हजार २६८ दूध संस्था विविध कारणांमुळे अवसायनात निघाल्या आहेत. या दूध संस्था पुन्हा पूर्वपदावर येणार की, मराठवाड्यातील शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी विस्तारु पाहत असलेली ही व्यवस्था रसातळालाच जाणार हा प्रश्न आहे.
शेतीपूरक व्यवसायपैकी एक महत्त्वपूर्ण व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायाला बळ देण्याचे काम दूध संस्था व संघाच्या माध्यमातून केले जाते. मराठवाड्यात एकून ४ हजार ६९७ प्राथमिक सहकारी दूध संस्था आहेत. त्यापैकी केवळ १ हजार ४१० दूध संस्था सुरू असून तब्बल ३ हजार २३८ संस्था अवसायनात निघाल्या आहेत. दूध संकलन बंद असणे, रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, ऑडिट दरवर्षी न करणे, दर पाच वर्षाला निवडणुका न घेणे, संकलनाची अद्ययावत माहिती देण्यात सहकार्य न दाखविणे यासह इतरही काही कारणांवरुन या संस्था अवसायनात काढण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे ४९ संस्था बंद पडल्या आहेत. या संस्थांना अवसायनात निघाल्यानंतर ६ वर्षात पूर्ववत होण्यासाठीची संधी असते. परंतु त्या संधीतही त्यांनी पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न न केल्यास त्या बंद पडतात, असा प्रघात आहे. तर बंद पडलेल्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांमध्ये परभणी जिल्ह्यातील ३७, हिंगोली जिल्र्ह्यातील २ नांदेड जिल्ह्यातील १० संस्थांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राथमिक सहकारी दूध संस्थांबरोबर मराठवाड्यातील एकूण १४ तालुका सहकारी संघांपैकी केवळ ७ संघ सुरू असून ३ बंद तर ४ संघ अवसायनात निघाले आहेत. दुसरीकडे एकूण ६ जिल्हा सहकारी संघांपैकी ३ जिल्हा सहकारी दूध संघ सुरू असून तीन अवसायनात निघाले आहेत. अवसायनात निघालेल्या तालुका सहकारी दूध संघंघात उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ व औरंगाबाद जिल्ह्यातील एक तसेच अवसायनात निघालेल्या जिल्हा सहकारी संघात जालना, परभणी व उस्मानाबाद जिल्हा सहकारी संघाचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Published on: 19 March 2021, 07:00 IST