घोडेबाजार हा अश्वप्रेमींसाठी आणि खरेदीदारांसाठी पर्वणी असतो. जातिवंत कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या घोड्यांची खरेदी-विक्री या ठिकाणी होत असते. दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अकलूजच्या घोडेबाजाराला सुरवात होत असते. मात्र यावर्षी उद्घाटनापूर्वीच एक कोटी रुपयांच्या घोड्यांची विक्री झाली आहे. यंदा बाजारात पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून तब्बल 1100 दर्जेदार अश्व उद्घाटनापूर्वीच दाखल झाले आहेत.
घोड्यांची किंमत ही त्याची उंची, रंग आणि चाल याच्यावर ठरते. घोडा जितका रुबाबदार, तितकी त्याची किंमत जास्त असते. महाराष्ट्रात येवला , मालेगांव , अकलुज, शिरपुर,सारंगखेड़ा या ठिकानी घोडेबाजार भरतो.यावर्षी बरेली येथून आलेला कोब्रा या अश्वाची सगळे चर्चा करत आहेत. तो साडेतीन वर्षाचा असून मारवाड जातीचा आहे. या अश्वाची उंची 63 इंच इतकी असून अतिशय देखणा असणाऱ्या या कोब्राला चांगले प्रशिक्षणही दिले गेले त्याला सुरुवातीलाच 50 लाखाची बोली लागली आहे.
यंदा दर्जेदार अश्व खरेदीसाठी तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथून मोठ्या संख्येने अश्व शौकीन अकलूज मध्ये दाखल झाले आहेत. अकलूज मधील भरणारा हा घोडेबाजार आता देशातील मुख्य घोडेबाजारात गणला जाऊ लागला आहे . या बाजारात पंचकल्याणी, नुखरा, अबलख, काटेवाडी, पंजाबी, मारवाड, सिंध अशा विविध प्रकारच्या अश्वांना पाहण्यासाठी देशभरातून खरेदीदार आणि घोडे शौकीन मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच अकलूज बाजारात 50 हजारापासून 50 लाखापर्यंत किमतीचे घोडे आहेत.
Published on: 05 November 2023, 06:23 IST