आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धनगर समाज हा त्यांच्या मेंढ्यांच्या उदरनिर्वाह करिता कायम फिरस्तीवरच असतात. कायम त्यांना त्यांचे घर सोडून मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे ही सगळी परिस्थिती समोर ठेवून मेंढपाळ बंधूंच्या जीवनामध्ये देखील सुधारणा करणे गरजेचे असून त्या अनुषंगाने मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता नियोजन करणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी बैठकीचे आयोजन केलेले होते व त्यामध्ये त्यांनी पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाला यासंबंधी काही आवश्यक कार्यवाही करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
अजित पवार यांनी केल्या या सूचना
याबद्दलचे सविस्तर वृत्त असे की धनगर बांधवांच्या जीवनामध्ये काळानुरूप सुधारणा करण्याच्या अनुषंगाने मेंढ्यांच्या पालन पोषणाकरिता चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिली तर यामुळे धनगर बांधवांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाकरिता आवश्यक उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होऊ शकेल व त्या दृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
राज्यातील धनगर व मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे व त्यांच्याकरिता असलेल्या विकास योजनांच्या अंमलबजावणी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात बैठक झाली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मेंढपाळ समाज हा वर्षानुवर्ष भटकंतीचे जीवन जगत असून त्यांची भटकंती थांबवणे गरजेचे आहे व त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणणे देखील गरजेचे आहे.
या अनुषंगाने ज्या पद्धतीने शेळी व कुक्कुटपालनाच्या योजना राबवल्या जातात अगदी त्याच धर्तीवर मेंढ्यासाठी देखील आता अर्धबंदिस्त निवारा उपलब्ध केला तर धनगर बांधवांची भटकंती थांबेल व याकरिता येणाऱ्या कालावधीमध्ये धनगर बांधवांच्या सामाजिक तसेच शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवावी लागतील असे देखील त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
तसेच त्यांनी यापुढे म्हटले की,शहरीकरण वाढल्यामुळे गायरान जमिनी व चराऊ कुरणे इत्यादींचे क्षेत्रात कमालीची घट झाली. त्यामुळे चराई क्षेत्राची कमतरता ही धनगर समाजापुढील मोठी समस्या आहे. कारण पावसाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पिके असतात व चारा त्यामुळे उपलब्ध होऊ शकत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत मेंढ्यांसाठी देखील आता अर्धबंदिस्त निवाऱ्याची व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून दिली तर या संबंधीचे अनेक प्रश्न मिटतील. एवढेच नाही तर अर्ध बंदिस्त निवाऱ्यामुळे मेंढ्यांचे आरोग्य देखील सुधारेल व त्यांच्या वजनात देखील वाढ होईल. तसेच मेंढ्यांच्या उत्तम संकरित जाती निर्माण करणे देखील शक्य होईल. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करण्यात येऊन त्याकरता लागणारा आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल असा विश्वास देखील त्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
Published on: 22 August 2023, 11:12 IST