सातबारा उतारा हे जमिनीच्या संदर्भातील एक महत्त्वाचे कागदपत्र असून कृषी क्षेत्राच्या संबंधित असलेल्या योजनांचा लाभ किंवा बँकेतून लोन घेण्यासाठी आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांना सातबारा उतारा लागतो. परंतु बऱ्याचदा सातबारा उताऱ्यावर अनेक छोट्या मोठ्या चुका झालेल्या असतात. या चुका कधी नावाच्या संबंधित असतात तर कधी संबंधित शेताच्या एकूण क्षेत्राशी निगडित असतात.
त्यामुळे या चुका खूप समस्या निर्माण करू शकतात. परंतु आता या चुका बदलण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या हेलपाट्या मारण्याची गरज नसून त्या तुम्हाला आता ऑनलाईन अर्ज करून दुरुस्त करता येणार आहेत. विशेष म्हणजे याकरिता राज्यात एक ऑगस्टपासून विशेष मोहीम देखील हाती घेण्यात आलेली आहे.
जमाबंदी आयुक्तालयाने सातबारा उतारे दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला होता व त्याला आता मान्यता मिळाल्यानंतर संबंधित प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सातबारा मध्ये प्रामुख्याने संगणकावर टायपिंग करताना चुका झालेल्या आहेत किंवा पूर्वी हस्तलिखित सातबारा असायचे तेव्हा देखील हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे अशा झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आला आहे.
अशा पद्धतीने होणार चुकांची दुरुस्ती
याकरिता संबंधितांनी ई हक्क पोर्टलवर सातबारा फेरफार यावर क्लिक करून त्या ठिकाणी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज करताना जे काही आवश्यक कागदपत्रे लागतील ते अपलोड करावीत. त्यानंतर केलेला हा ऑनलाईन अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी त्या संबंधित कागदपत्रांची पुरावे तपासतो व त्याची पूर्तता तलाठ्याच्या माध्यमातूनच करण्यात येणार आहे व झालेली दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेकरिता पाठवली जाणार आहे.
या पद्धतीला मिळत आहे मोठा प्रतिसाद
महसूल सप्ताहाच्या निमित्ताने हस्तलिखित व संगणीकृत सातबारा उताऱ्याच्या दुरुस्तीची प्रक्रिया आता हाती घेण्यात आली असून याला शेतकऱ्यांचा देखील मोठा प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. तसेच प्राप्त झालेल्या अर्जांवर तातडीने सुनावणी घेऊन त्यासंबंधीचा निर्णय देण्याचे निर्देश देखील सर्व तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रक्रियेची जिल्हाधिकारी स्तरावर देखील नोंद ठेवली जाणार आहे त्यामुळे ही प्रक्रिया वेगात होईल अशी शक्यता आहे. त्यामुळे नक्कीच नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
Published on: 23 August 2023, 10:03 IST