पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी जगात विख्यात आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन घेतले जात असल्याने नाशिक जिल्ह्याला द्राक्षे पंढरी म्हणून संबोधले जाते. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात द्राक्षाच्या बागा नजरेस पडत असतात. याच तालुक्यात एका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने आपली द्राक्ष बाग कुऱ्हाडीच्या साह्याने मोडीत काढली असल्याचा धक्कादायक घटना बघायला मिळाली आहे.
हेही वाचा:-अरे बापरे! कीटकनाशकात तननाशक घटक म्हणुन द्राक्ष बागा सुकल्या; शेतकऱ्यांचे लाखोंच नुकसान
जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या संकटांचा सामना करत आहेत. अस्मानी संकट आणि सुलतानी संकटांचा सामना करत कशीबशी द्राक्षाची बाग जोपासत आहेत. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगावर कोरोना नामक महाभयंकर आजाराने दस्तक दिली यामुळे राज्यात देखील लॉकडाऊन लावण्यात आले होते. लॉकडाउनमुळे द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष विक्री करण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यावेळी द्राक्ष बागायतदारांनी अगदी कवडीमोल दरात आपल्या सोन्यासारख्या द्राक्षांची विक्री केली होती. या हंगामात देखील द्राक्ष बागा काढणीसाठी सज्ज असताना खरेदीदार मिळत नसल्याने द्राक्ष बागायतदार पुरता मेटाकुटीला आला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
द्राक्ष बागांची वेळेवर हार्वेस्टिंग होत नसल्याने बागायतदार आधीच संकटात आहेत आणि अशा परिस्थिती द्राक्ष बागांवर अवकाळी आणि गारपीट नामक संकटांमुळे रोगराईचे सावट वाढतच आहे. यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट घडणार असल्याची दाट शक्यता आहे. या सर्व संकटांमुळे द्राक्ष बागायतदार पुरता हतबल झाला असून आर्थिक कोंडीत सापडला आहे.
काहीशा अशाच परिस्थितीचा निफाड तालुक्यातील मौजे गोळेगाव येथील द्राक्ष बागायतदार बाळासाहेब मुदगुल यांना सामना करावा लागत असल्याने या द्राक्ष बागायतदाराने आपली एक एकर सोन्यासारखी द्राक्षाची बाग तोडून टाकली आहे.
अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली द्राक्षाची बाग तोडण्याची बाळासाहेब यांच्यावर नामुष्की ओढावली आहे. बाळासाहेब यांना गेल्या पाच वर्षापासून द्राक्ष बागेतून कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत आहे परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की यातून त्यांना उत्पादन खर्च काढणे देखील मोठे मुश्कील होऊन बसले आहे. लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करून कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने बाळासाहेब यांनी द्राक्ष बाग तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे द्राक्ष बागायतदार मेटाकुटीला आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Published on: 15 March 2022, 10:59 IST