गतवर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले होते, कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी यामुळे शेतकरी बांधव पुरता हतबल झाला होता. या निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्वात जास्त फटका नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांना बसला होता. या नूतन वर्षात तरी निसर्ग साथ देईल या आशेने कांदा उत्पादक शेतकरी बांधव नव्याने प्रयत्नरत झाला होता. मात्र या नूतन वर्षातही जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी व बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसताना दिसत आहे. जिल्ह्यातील कांदा एक मुख्य नगदी पीक म्हणून ओळखले जाते जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण हे कांदा पिकावर अवलंबून असते. मात्र याच पिकाची अवकाळी व बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसत आहे.
कांद्याचे पीक अल्प कालावधीत तयार होणारे पीक असते त्यामुळे या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर याचा परिणाम सरळ उत्पादनावर होतो. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादनात कमालीची घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील निफाड तालुक्यात देखील अनेक शेतकरी खरीप हंगामात कांदा लागवड करतात, मात्र या खरीप हंगामात येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना निसर्गाच्या अवकृपेचा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व त्यानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे तालुक्यातील मरळगोई येथील एका शेतकऱ्याला आपल्या कांदा पिकावर चक्क रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील मौजे मरळगोई येथील रहिवासी शिवाजी खांदूर्डे यांनी खरीप हंगामात सुमारे एक एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली होती.
कांदा लावून सुमारे दोन महिने उलटली तरीदेखील कांदा पोसला जात नव्हता, याचे प्रमुख कारण म्हणजे कांदा लागवडीनंतर तालुक्यात अवकाळीने हजेरी लावली होती या अवकाळी मुळे व त्यानंतर तयार झालेल्या वातावरणामुळे कांदा पिकावर अनेक बुरशीजनीत रोगांचे सावट नजरेला पडत होते, तसेच यामुळे करपा व कांद्याच्या मुळाना सडवा लागला होता. म्हणून शिवाजी यांनी लावलेला एक एकरावरील कांदा पोसला गेला नाही. त्यामुळे शिवाजी यांनी आपल्या एक एकरावरील कांदा पिकाला रोटावेटर मारण्याचा निर्णय घेतला. अवकाळी व बदललेल्या हवामानाचा फटका फक्त शिवाजी यांनाच बसलाय असं नाही तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे
त्यामुळे कांदा लागवडीचा खर्च हा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे तसेच महागड्या औषधांची फवारणी करून देखील कांदा पीक नव्याने उभारी घेताना दिसत नाही त्यामुळे याचा सरळ परिणाम उत्पादनावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी व बदलत्या हवामानामुळे येणाऱ्या या रोगांवर ठोस उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. यासाठी कृषी विभागाला जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. मात्र अद्याप तरी कृषी विभागाचे या बाबीकडे लक्ष नाही, येत्या काही दिवसात कृषी विभाग याकडे लक्ष देईल की नाही हे बघण्यासारखे असेल.
Published on: 07 January 2022, 03:58 IST