राज्यातील शेतकरी गत वर्षापासून अस्मानी संकटासमवेत सुलतानी संकटांचा सामना करत आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी राजांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकरी राजा अनेकदा चुकीच्या मार्गदर्शनामुळे देखील मोठ्या संकटात सापडत असतो आणि त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटांत सापडत असतो. असेच एक उदाहरण समोर आले आहे ते मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातून.
जिल्ह्यातील सिंधी कोळगाव येथील रहिवासी शेतकरी विष्णुपंत गिराम यांना चुकीच्या मार्गदर्शनामुळे हजारो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याचं झालं असं गिराम यांनी आपल्या उन्हाळी सोयाबीन पिकात एका तननाशकाची फवारणी केल्यामुळे सोयाबीन पिकातील गवत समवेतच सोयाबीन पिक देखील राख होऊन मातीमोल झाले. गिराम यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली होती. गिराम यांनी फुले संगम या वाणाचे सोयाबीन उन्हाळी हंगामात लागवड केली, सोयाबीन मध्ये अधिक प्रमाणात गवत वाढले असल्याने त्यांनी तणनाशक फवारणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी ओळखीच्या कीटकनाशक विक्रेत्याचा सल्ला घेऊन साकेत कंपनीच्या तणनाशकाची फवारणी केली. मात्र यामुळे सोयाबीन मधील गवता समवेतच संपूर्ण सोयाबीन पीक जळायला सुरुवात झाली.
गिराम यांनी खरीप हंगामात तुरीची लागवड केली होती मात्र परतीच्या पावसामुळे तुरीच्या पिकाला मोठा फटका बसला, आणि उत्पादनात घट झाली. त्यामुळे गिराम यांनी खरीप हंगामातील तुरीच्या पिकाची भरपाई भरून निघेणं या आशेने तुरीचे पीक काढणी झाल्यानंतर उन्हाळी सोयाबीनची लागवड केली. त्यांनी सोयाबीन पिकासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला, योग्य पाणी व्यवस्थापन तसेच इतर बाबींची काळजी घेत गिराम यांनी सोयाबीन पिक जोमदार वाढवले. सोयाबीन पीक एक महिन्याचे झाले मात्र त्यात जास्त प्रमाणात गवत वाढले असल्याने त्यांनी औषध विक्रेत्याचा सल्ला घेऊन साकेत कंपनीचे तणनाशक फवारले, मात्र त्यामुळे दोन तीन दिवसात गवतासमवेत सोयाबीन पीक पूर्ण करपून गेले.
गिराम यांनी त्यांच्या सोयाबीन पिकाबाबत घडलेली घटना औषध विक्रेत्यांला सविस्तर कथन केली, त्यावेळी औषध विक्रेत्याने संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्याचा नंबर गिराम यांना दिला. गिराम यांनी त्यांच्या शेतात घडलेले सर्व घटना संबंधित अधिकार्याला सांगितली मात्र अधिकाऱ्याने सकारात्मक प्रतिसाद दाखवला नाही. त्यामुळे गिराम यांनी तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे धाव घेऊन याबाबत तक्रार नोंदवली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी गिराम यांच्या शेतात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी गिराम यांनी नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.
गिराम यांनी उन्हाळी सोयाबीन लागवड करण्यासाठी सुमारे 25 हजार रुपयांचा खर्च आला असल्याचे सांगितले. एकंदरीत चुकीचे तणनाशक फवारल्यामुळे गिराम यांचे पंचवीस-तीस हजार रुपयाचे नुकसान तर झालेच शिवाय त्यांनी घेतलेली मेहनत देखील पूर्णतः वाया गेली. चुकीच्या मार्गदर्शनामुळे गिराम यांचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया गेला.
Published on: 23 January 2022, 10:06 IST