कोल्हापूर
टोमॅटोला सध्या चांगले दर मिळत आहेत. या दरामुळे काही शेतकरी लखपती, करोडपती झाले आहेत. पण काही टोमॅटो उत्पादकांच्या टोमॅटोवर भुरट्या चोरांच्या नजरा पडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यांनी जवळपास ५० हजारांची टोमॅटो तोडून लंपास केली आहेत.
करवीर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या टोमॅटो शेतीची काही अज्ञातांनी केलेली नासधूस ताजी असतानाच आता टोमॅटोच शेतातून चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच चिंता वाढली आहे. शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोची चोरी झाली आहे.
टोमॅटो पीक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही या कॅमेरांना चोरट्यांनी चकवा देत टोमॅटोची चोरी केली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी केली होती. त्यांनी दोन दिवसांमध्ये टोमॅटो तोडण्याचे नियोजन केले होते. परंतु, शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने धक्का बसला.
दरम्यान, टोमॅटोला चांगला दर मिळत असल्यामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला आहे.सिन्नरच्या धुळवड गावात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. उत्पन्न चांगलं मिळाल्याने अनेक शेतकरी कोट्यवधी झाले आहेत. त्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत असून याच पार्श्वभूमीवर बॅनर लावण्यात आले आहेत.
Published on: 29 July 2023, 05:20 IST