Mumbai News :
कांदा प्रश्नी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण आजच्या (दि.२६) या बैठकीत काही तोडगा निघाला नाही. कांदा व्यापाऱ्यांचे मत या बैठकीत जाणून घेण्यात आले आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या केंद्र सरकारशी आणि नाफेडशी संबंधित असल्याने आज पुन्हा सह्याद्री अतिथीगृहावर वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत बैठक होणार आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
आजच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. पण या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्याचे मंत्री कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलून तरी तोडगा काढणार का? हे पाहण आता महत्त्वाच आहे.
आज संध्याकाळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पुन्हा एकदा बैठक होणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या केंद्राशी निगडित आहेत असं सुद्धा भुजबळ यांच्याकडून सांगण्यात आला आहे. यामुळे आज सायंकाळी ७ वाजता राज्याचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची बैठक पार पडणार आहे.
व्यापाऱ्यांच्या काय आहेत मागण्या?
१) बाजार समित्यांमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा थेट बाजारात विक्री करू नये.
२) ग्राहकांना रेशन मार्फत खरेदी केलेला कांदा द्यावा.
३) कांद्यावर लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे.
४) संपूर्ण देशात विक्रेत्याकडून चार टक्के आडत घ्यावी.
५) देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी.
६) बाजारभाव वाढल्यानंतर चौकशी करू नये.
Published on: 26 September 2023, 02:03 IST