मुंबई: शेतकऱ्यांच्या हितासाठीच अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करत असताना स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या लक्षात घेऊन प्रकल्प आराखड्यानुसारच काम करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. निळवंडे, जि. अहमदनगर येथील प्रकल्पग्रस्त व कालवेग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी निळवंडे धरणासाठी संपादित केल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पाण्याचा हक्क मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यासाठी कार्यरत असलेल्या उपसा सिंचन योजनेचे पुन्हा सर्वेक्षण करुन उपसा सिंचन योजना सुरळीत करण्यात येईल. तसेच प्रवरा नदीतील प्रोफाईल वॉलचे काम, म्हाळादेवी येथील जलसेतूचे काम, राजूर पिंपरकणे उड्डाणपुलाचे काम लवकर पूर्ण करण्यात येईल.
निबंळ येथील जलविद्युत प्रकल्पात ज्या लोकांच्या जमिनी गेल्या आहेत, अशा लोकांना जमिनी वाटप प्रकरणाची चौकशी करावी. जे नियमात आहे, त्यानुसारच जमीन वाटप करण्यात यावी. प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि प्रशासन यांनी समन्वयाने काम करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत भंडारदरा व निळवंडे धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी बुडीत बंधारे बांधण्यात यावे. उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या पाणी नियोजनात केंद्रीय जल आयोग सूचनानुसार आढळा धरणाच्या लाभक्षेत्रास बाधा न पोहचवता परिसरातील इतर क्षेत्रासंदर्भात चर्चा करण्यात आली. माळेगाव-केळूंगण उपसा सिंचन योजना आणि राजूर, शेलविहीरे, बाभुळवंडी, देवगांव, टिटवी उपसा सिंचन योजना, निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे-पाटील, आमदार शिवाजी कर्डिले, वैभव पिचड, माजी मंत्री मधुकर पिचड, राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल उपस्थित होते.
Published on: 12 June 2019, 11:44 IST