मुंबई: ‘माझी माय पण मातीच्या भांड्यात बियाणे साठवूण ठेवायची. तुमचं काम पाहून मला आईची आठवण झाली’, अशी भावना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी ‘बीजमाता’ राहीबाई पोपेरे यांच्याजवळ व्यक्त केली. रयतेच्या राजाच्या जयंतीदिनी शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचे काम करणाऱ्या राहीबाईंची भेट घेण्यासाठी कृषीमंत्र्यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गाव गाठले. देशभर ‘सीडमदर’ म्हणून ओळख बनलेल्या राहीबाईंना ‘पद्मश्री’ जाहीर झाल्याबद्दल या कृषीमातेचा साडीचोळी देऊन कृषीमंत्र्यांनी सत्कार देखील केला.
राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली आहे. ते काम राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग सहकार्य करील. मानवी आरोग्यासाठी उपयुक्त असलेल्या स्थानिक वाणांच्या संवर्धनाला चालना देतानाच त्याच्या बिजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, असे कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.
स्थानिक देशी बियाण्यांचं वाण जतन करण्याचं अमूल्य काम त्या करीत असून राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांचं काम पोहोचावे यासाठी कृषी विभाग त्यांना सहकार्य करेल. स्थानिक वाणात पोषणमूल्य भरपूर असल्याने मानवी आरोग्याला ते उपयुक्त आहेत. त्यामुळे आता अनेकांचा ओढा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या अन्न घटकांकडे वाढला आहे, असे कृषीमंत्री यावेळी म्हणाले.
राहीबाई करीत असलेल्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे सादर करू, असे कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्या करीत असलेल्या कामाला मोठं स्वरूप देऊ. त्यांचं जुन्या वाणांचं संवर्धनाच काम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. स्थानिक वाण प्रसाराला मदत करतानाच ही संकल्पना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाईल, अशी ग्वाहीही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिली. यावेळी कृषीमंत्र्यांनी राहीबाईंच्या सीडबँकेची पाहणी केली.
राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. त्यांच्याकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते, ते मूळ स्वरूपात आहे. त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवला आहे. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते.
राहीबाईंनी भाजीपाला, भात, गहू, बाजरी, कडधान्ये पिकांच्या 112 प्रकारचे वाण जतन करून ठेवले आहेत. त्यांनी महिला शेतकऱ्यांचा गट स्थापन करून त्या माध्यमातून जुन्या वाणांचे बिजोत्पादन केले जाते. आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांनी त्यांनी तयार केलेले बियाणे त्यांच्याकडून नेले आहे. देशभरातून कृषी तंत्रज्ञान शिकणारे अनेक विद्यार्थी त्यांचा हा प्रकल्प बघायला येतात.
Published on: 20 February 2020, 08:41 IST