News

भिगवण येथील ५ उपक्रमशील महिलांनी मच्छीमार, शेततळी असलेल्या शेतकऱ्यांकडून मत्स्यबीजांची मागणी लक्षात घेऊन मत्स्यबीज निर्मिती केंद्राची सुरुवात केली. या केंद्रातून संपूर्ण राज्यभर मस्त्यबीजाचा पुरवठा केला जातो. या केंद्राच्या माध्यमातून महिलांनी वेगळी ओळख तयार केली आहे. शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा पूरक व्यवसायात राज्यातील महिला आघाडीवर आहेत

Updated on 06 August, 2021 11:44 PM IST

भिगवण येथील ५ उपक्रमशील महिलांनी मच्छीमार, शेततळी असलेल्या शेतकऱ्यांकडून मत्स्यबीजांची मागणी लक्षात घेऊन मत्स्यबीज निर्मिती केंद्राची सुरुवात केली. या केंद्रातून संपूर्ण राज्यभर मस्त्यबीजाचा पुरवठा केला जातो. या केंद्राच्या माध्यमातून महिलांनी वेगळी ओळख तयार केली आहे. शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा पूरक व्यवसायात राज्यातील महिला आघाडीवर आहेत याच बरोबरीने आता चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणून मत्स्यबीज निर्मितीकडे भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील ५ प्रयोगशील महिला वळल्या संपूर्ण राज्यातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन महिलांनी रोहू, कटला, सायप्रिनस, मृगळ, गवत्या या माशांच्या बीजनिर्मितीला सुरुवात केली.

भिगवण येथील वैशाली मल्लाव, ऋतुजा जगताप, शीतल रायते, कोमल कदम, आशा सलमपुरे या पाच महिला मत्स्यबीजनिर्मिती केंद्रासाठी एकत्र आल्या मच्छीमार आणि शेततळी असलेल्या शेतकऱ्यांकडून वाढती मत्स्यबीजाची मागणी लक्षात घेऊन या महिलांनी २०१८ मध्ये भिगवण कार्प मत्स्यबीज उत्पादन व संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली मत्स्यबीज केंद्राची सुरुवात करताना त्यांनी मत्स्य विभागाकडून तांत्रिक प्रशिक्षण घेतले. सध्या या महिला गटाला भरत मल्लाव यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे.

मत्स्यबीज निर्मितीची सुरुवात

मत्स्यबीज केंद्रासाठी महिला गटाने २०१८ मध्ये भिगवण - राशीन मार्गावर ॲड.पांडुरंग जगताप यांची २ एकर जमीन १० वर्षांच्या कराराने घेतली. या ठिकाणी मत्स्यबीज निर्मितीसाठी दोन प्रजनन टाक्या आणि पाणी टाकीची उभारणी केली. यासाठी ३० लाख रुपये खर्च आला. मत्स्यबीज केंद्राची उभारणीसाठी तत्कालीन मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विधळे, गोविंद बोडके, सह.आयुक्त विनोद नाईक, पुणे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे तसेच अविनाश नाखवा, भीमाशंकर पाटील, निवृत्त मत्स्य विकास अधिकारी अजित वाकडे यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळाले. या केंद्राला मत्स्य व्यवसाय विभागाकडून १२ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

हेही वाचा : या राज्यात मत्स्यपालनासाठी बिनव्याजी कर्ज, मत्स्य शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

मत्स्यजिरे वाढविण्यासाठी तलाव

मत्स्यबीज केंद्रामध्ये तयार झालेले मत्स्यजिरे वाढविण्यासाठी महिला गटाने लासुर्णे जंक्शन (ता. इंदापूर जि. पुणे) येथील मयूर यादव यांच्याकडून २५ एकर क्षेत्र १० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतले आहे. या ठिकाणी १७ एकरात मत्स्यबीज संगोपन तलाव तयार करण्यात आला आहे यासाठी २० लाखांची गुंतवणूक केली आहे. प्रत्येकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मत्स्यबीज संगोपन केंद्राच्या उभारणीसाठी मदत झालेली आहे.

जातीनुसार मत्स्यजिरे संगोपनासाठी एकूण ९ लहान तलाव आहेत मत्स्यबीज संगोपनापूर्वी हे तलाव स्वच्छ करून ब्लिचिंग पावडर टाकून पूर्णपणे निर्जंतुक केले जातात. त्यानंतरच केंद्रामध्ये निर्मिती केलेले मत्स्यजिरे तलावात सोडले जाते हमखास पैसे मिळवून देणारा हा व्यवसाय असला तरी यामध्ये गुणवत्तापूर्ण मत्स्यबीज निर्मितीसाठी चांगली मेहनत घ्यावी लागते राज्यभरातील लहान-मोठे तलाव, जलाशयात मासेमारी करणाऱ्या मच्छीमार संस्था तसेच शेततळी असलेल्या शेतकऱ्यांकडून रोहू, कटला, सायप्रिनस, मृगल, गवत्या मत्स्यबीजाला चांगली मागणी असते.

प्रजनक माशांचे संगोपन

 साधारण १५ जून ते १५ ऑगस्ट हा माशांचा प्रजनन कालावधी असतो. त्यासाठी मार्च महिन्यापासून प्रजनक मासे (अंड्यावरील माद्या, नर) शोधावे लागतात. परिसरातील शेततळे, तलाव असलेल्या लोकांच्या बरोबरीने संपर्क साधून प्रजनक मासे घेऊन ते साठवणूक तलावात सोडले जातात. सरासरी १५० ते २०० रुपये प्रति किलो दराने प्रजनक माशांची खरेदी केली जाते. १५ जूनपर्यंत या माशांना खाद्य देऊन संगोपन केले जाते. १५ जूनपासून प्रजनन हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी प्रजननासाठीच्या टाक्या स्वच्छ धुऊन घेतल्या जातात. हंगामापूर्वी प्रजनक माशांना लागणारी हार्मोन्सची खरेदी केली जाते.

मत्स्यजिऱ्यांची निर्मिती

सुरुवातीला प्रजनक नर आणि माद्या वेगळ्या केल्या जातात. वजनाप्रमाणे नर, माद्यांची जोडी तयार केली जाते. साधारण सायंकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यान या प्रजनक माशांना त्यांच्या वजनाप्रमाणे हार्मोन्स इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर प्रजनन टाकीतील पाण्याला अपेक्षित वेग दिला जातो. इंजेक्शन दिल्यानंतर सहा तासांच्या कालावधीनंतर संबंधित प्रजनक मासे अंडी देण्यास सुरुवात करतात. पहाटेपर्यंत ही प्रकिया सुरू असते. पुढील ६ तासांनंतर ही अंडी फलित होतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत या अंड्यातून मत्स्यजिरे निर्मिती होते. साधारणपणे मत्स्य जिऱ्यांची ६ दिवसांची एक बॅच तयार होते.

यामध्ये माद्यांच्या प्रमाणात एकावेळी १० लाख ते ५० लाख मत्स्यजिऱ्यांची निर्मिती होते यंदाच्या हंगामात या महिला गटाने आत्तापर्यंत एक कोटी मत्स्यजिरे निर्मितीचे उद्दिष्ट गाठले आहे येत्या १५ दिवसांच्या कालावधीत ५० लाख मत्स्यजिऱ्यांचे उत्पादन होईल, असा त्यांना विश्‍वास वाटतो. यंदाच्या हंगामात मत्स्यजिरे निर्मितीमध्ये प्रिया मल्लाव, तन्वी मल्लाव, प्रगती माने, कोमल मल्लाव, प्रज्विता मल्लाव या मुली कौशल्य मिळवीत आहेत.

 

मत्स्यबीज केंद्राला मिळाले प्रोत्साहन

 भिगवण येथील मत्स्यबीज केंद्राला तत्कालीन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, विद्यमान मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेटी देऊन या मत्स्यबीज उत्पादन केंद्राचे कौतुक केले आहे. येत्या काळात या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र, जिवंत माशांच्या विक्रीचे केंद्र सुरू करण्याचे महिला गटाचे नियोजन आहे.

मत्सजिऱ्यांना चांगली मागणी

पावसाळा सुरू झाल्यावर शेततळी, तलाव, धरणे पाण्याने भरू लागतात. त्यानंतर आकारमानानुसार अर्ध बोटुकली, बोटुकली, साधारण अर्धा इंचापासून ४ ते ५ इंच आकाराच्या मत्स्यबीजाची मागणी सुरू होते. मागणीनुसार महिला गटातर्फे मत्स्यबीज पुरवठा केला जातो. मत्स्यजिरे विक्रीचा दर हा जातीनिहाय प्रति लाख मत्सजिऱ्यांसाठी दीड ते दोन हजार रुपये आणि अर्धा ते तीन, चार, पाच इंच आकाराचे प्रति हजार मत्स्यबीज सातशे ते साडेतीन हजार रुपये या दराने विक्री केली जाते गेल्या दोन वर्षात प्रायोगिक तत्त्वावर या महिला गटाने मत्स्यबीज विक्रीतून पंधरा लाख रुपयांची उलाढाल केली. यंदाच्या वर्षी मागणीत वाढ झाली आहे.

लेखक - प्रवीण सरवदे कराड

प्रतिनिधी गोपाल उगले

English Summary: The women of Bhigwan became self-reliant due to the Fish Seed Center
Published on: 06 August 2021, 11:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)