राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली गेली होती, खरिपातील लाल कांद्यावर निसर्गाची अवकृपा असल्याने या हंगामात लाल कांद्याच्या उत्पादनात थोडी घट नमूद करण्यात आली मात्र असे असले तरी रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याला राज्यातील शेतकऱ्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे त्यामुळे राज्यात यंदा विक्रमी उन्हाळी कांदा लागवड झाल्याचे समजत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवड करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यामध्ये प्रमुख आहे मजूर टंचाईची समस्या. मजूर टंचाईने त्रस्त असलेले कांदा उत्पादक शेतकरी आता आधुनिकतेची कास धरून आधुनिक यंत्रांचा वापर करू लागले आहेत. मजूर टंचाईची समस्या पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवली होती.
अशीच काहीशी परिस्थिती नगर जिल्ह्यात देखील नजरेला पडली यावर उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे आणि कांदा लागवडीसाठी आधुनिक यंत्रांचा सर्रासपणे वापर सुरू केला आहे. नगर जिल्ह्यात टाकळी येथे एका शेतकऱ्याने अत्याधुनिक यंत्राचा वापर करीत कांदा लागवड केल्याचे दृश्य बघायला मिळत आहे, शेतकऱ्याच्या मते त्यांच्याद्वारे केल्यात आलेला हा प्रयोग जिल्ह्यात नवखा असून या प्रयोगाचे ते पहिले मानकरी आहेत. अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने कांदा लागवड केल्यास वेळ आणि पैशांची बचत होते याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेवर कांदा लागवड होणे यामुळे शक्य झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक भागात मजूरटंचाई प्रकर्षाने जाणवत आहे मजूरटंचाई झाली असल्याने शेतकऱ्यांना शेतकामासाठी अधिकची मजुरी मोजावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचे शेतकऱ्यांद्वारे कथन केले जात आहे. त्यामुळे टाकळी येथे अत्याधुनिक यंत्राचा वापर करत आबासाहेब राऊत या शेतकऱ्याने पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरत अत्याधुनिक यंत्राद्वारे कांदा लागवड केली आहे. आबासाहेबांचा हा अनोखा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचा चर्चेचा विषय बनला आहे.
नगर जिल्ह्यात खरीप हंगामात झालेल्या समाधानकारक पावसामुळे तसेच उन्हाळी हंगामात कांद्यासाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यात सर्वत्र विक्रमी उन्हाळी कांदा लागवड केली गेली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी एकरी साडेबारा हजार रुपयांपर्यंतची मजुरी मोजावी लागली आहे. गतवर्षी एकरी साडेसात हजार रुपये कांदा लागवडीसाठी मजुरी लागत होती त्यात आता तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात केवळ एकाच वर्षात दुपटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात विशेषता टाकळी परिसरात ऊस या नगदी पिकाची मुख्य पीक म्हणून लागवड केली जाते मात्र असे असले तरी या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी एक वेगळा बेत आखला असून अल्प कालावधीत काढणीला येणाऱ्या कांदा या पिकाची लागवड करण्यास प्राधान्य दिले आहे. तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्राच्या साहाय्याने कांदा लागवड केली असल्याने त्यांना दर्जेदार उत्पादनाची आशा आहे, काही शेतकऱ्यांनी या आधी देखील आधुनिक तंत्राचा वापर करून कांदा लागवड केल्याचे बघायला मिळाले होते त्यातून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले असल्याने शेतकऱ्यांच्या आशा अजून पल्लवित झाल्याचे बघायला मिळत आहे. आतापर्यंत पारंपारिक शेती पद्धतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती केली जात होती मात्र आता टाकळी परिसरातील आबासाहेब यांनी यापुढे एक पाऊल टाकून अत्याधुनिक पद्धतीने कांदा लागवड केल्याचे दृश्य बघायला मिळत आहे. आबासाहेबांच्या मते परिसरात हा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच अस्तित्वात आला असून याद्वारे यशस्वी कांदा लागवड झाली आहे. आबासाहेबांनी कांदा लागवडीसाठी देवळाली प्रवरा येथील एसपी ऍग्रो कडून अत्याधुनिक ट्रॅक्टर चलित कांदा लागवड यंत्र खरेदी केले. या कांदा लागवड यंत्र चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या यंत्राद्वारे वाफा पद्धतीने तसेच बेड पद्धतीने कांदा लागवड केली जाऊ शकते.
या यंत्राचा वापर करून खुर्चीवर बसता बसता कांदा लागवड करणे शक्य झाले आहे तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल पण हे मात्र खरं आहे. या यंत्राद्वारे एका दिवसात 40 गुंठे क्षेत्र लागवड केली जाऊ शकते. सहा फूट बेडवर या यंत्राद्वारे यशस्वी लागवड होते. तसेच एका बेड वर दहा ओळी कांद्याची लागवड करणे शक्य होते. या यंत्राद्वारे कांदा लागवड करण्यासाठी एकूण सात मजुरांची आवश्यकता भासते. यापैकी पाच मजूर यंत्रात रोपे टाकण्यास, एक रोप देण्यासाठी तसेच यावर लक्ष ठेवण्यासाठी एक सुपरवायझर आणि एक मजूर अतिरिक्त लागतो. विशेष म्हणजे या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी पारंपारिक पद्धतीपेक्षा खूपच अत्यल्प खर्च येतो. शेतकऱ्यांच्या मते, यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी मजुरीच्या निम्म्याने खर्च येत आहे. जास्त शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच जास्त कांदा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या यंत्राचा विशेष फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: 01 February 2022, 06:11 IST