नागपूर : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणातील लोकांचे मोठं नुकसान झाले होते. या चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला आहे. 170 कोटी 72 लाख 73 हजार रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. हा निधी तात्काळ वितरणाच्या सूचना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या आहेत.
वादळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वडेट्टीवार यांनी 4 दिवसांचा कोकण दौरा केला होता. नागरिकांसोबत संवाद साधून वादळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द सरकारने पाळल्याचं यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवारांनी 20 ते 22 मे रायगडमधील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांचा तीन दिवस दौरा करून लोकांशी थेट संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली होती.
तौक्तेने उडवली होती महाराष्ट्राची दाणादाण
तौत्के चक्रीवादळाने महाराष्ट्रात दाणादाण उडवून दिली होती. चक्रीवादळामुळे कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर तथा राज्याच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस कोसळला होता. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळाने गती घेतल्यामुळे त्याचा फटका रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना सर्वाधिक बसला.
समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना वादळाचा फटका बसला होता. त्यामुळे किनारपट्टी भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
Published on: 30 June 2021, 08:54 IST