सध्या अनेकजण इतर चांगले पर्याय असताना देखील नोकरीच्या मागे धावतात. तसेच असेही काही तरुण आहेत की जे मोठ्या पगाराची नोकरी असून देखील व्यवसाय करून त्यामधून बक्कळ पैसे कमवतात. असेच काहीसे जम्मूतील अबिनीश खजुरिया या तरुणाने करून दाखवले आहे. यामुळे एक वेगळा आदर्श या तरुणाने निर्माण केला आहे. यामुळे या तरुणाचे कौतुक केले जात आहे. या तरूणाने त्याची भरघोस पगाराची नोकरी सोडून डेअरी व्यवसाय सुरू केला आहे. अनेक तरुणांना त्याने रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
हा तरुण सुरुवातीला मोठ्या पगाराची नोकरी करत होता. मात्र आता हा तरूण आयटी कंपनीतली नोकरी सोडून स्वत:चा दूध व्यवसाय करत आहे. त्याचा आता जम्मूमध्ये एक मोठा गोठा आहे. त्याच्या गोठ्यात शंभरपेक्षा जास्त गाई आहेत. घरातूनच शेतीचे बाळकडू मिळालेल्या अबिनीशचे वडील कुलभूषण खजुरिया यांनी दुग्ध व्यवसायात नाव कमावले आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केवळ ५-६ गायी होत्या. त्यानंतर २०१५ साली त्यांनी १५ गायींपासून दुधाचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आता त्यांच्याकडे अनेक तरुण कामाला आहेत.
आज त्यांच्याकडे चाळीसपेक्षा जास्त गाई दुभत्या आहेत, ते या सगळ्या गाईंचे योग्य नियोजन करतात. अबिनीश संगणक शास्त्रामध्ये पदवी घेतल्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होता. मात्र, त्याचा कल वडिलांच्या दुग्ध व्यवसायाकडे होता. आज तो त्याच्या वडिलांसोबत डेअरीचे कामही सांभाळत आहे. असे असले तरी शेतकरी कुटूंबातील वडीलधारी शक्यतो त्यांच्या मुलांना शेतीमध्ये काम करू नको असा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे यामध्ये खूपच काम करावे लागते, तसेच यामध्ये स्थिरपणा नसतो. पैसे मिळतील की नाही याबाबत संभ्रम असतो. मात्र त्याच्या कुटूंबाने त्याला पाठींबा दिला आहे.
कुलभूषण यांचे वडीलही शेतकरी होते. ज्यांच्याकडून ते शेती शिकले. आज ते चांगले पैसे कमवत आहेत. त्याच्याकडे कमला १५ तरुण आहेत. तसेच त्याच्या गाईंपासून मिळणाऱ्या खतामधून ते वेगवेगळ्या प्रकारचे चांगले खत तयार करतात. यामधून देखील त्यांना चांगले पैसे मिळतात. त्यांचा गोठा हा आधुनिक पद्धतीने त्यांनी बनवला आहे. यामुळे कामाला जास्त वेळ लागत नाही. तसेच त्याच्या गोठ्यात अनेक जातींच्या गाई आहेत. त्यांच्या गोठ्यात अनेक शेतकरी भेट देण्यासाठी तसेच माहिती घेण्यासाठी येत असतात.
Published on: 15 January 2022, 04:32 IST