News

राज्याच्या विविध भागात पावसाने उघडीप दिली आहे, दरम्यान पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्रावरुन बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे.

Updated on 23 July, 2020 11:24 AM IST
AddThis Website Tools


राज्याच्या विविध भागात  पावसाने उघडीप दिली आहे, दरम्यान पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. अरबी समुद्रावरुन बाष्पाचा पुरवठा होत असल्याने राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे.  तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकू लागला आहे. बुधवारी हा कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून मिर्झापूरपर्यंत सक्रिय होता.

हिमालयाच्या पायथ्याकडे असलेल्या पूर्वेकडील भागही दक्षिणेकडे सरकू लागला आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यासह मध्य आणि पूर्व भारतात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. बुधवारी  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या.  दरम्यान आजपासून घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे, कोकणातील रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील सातारा, नगर, नाशिक, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. दरम्यान एनसीआरमध्ये  पावसाचे सत्र चालू आहे. बुधवारी दिल्ली- एनसीआरच्या सर्व भागात पाऊस झाला.  तर हिमाचल प्रदेशच्या सहा जिल्ह्यांमध्ये २४ ते २६ जुलैपर्यंत दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज असून येथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील २४ तासात पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आणि उत्तर प्रदेशात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस झाला. येत्या २४ तासात पश्चिम बंगाल, पुर्वेकडील भारत, झारखंड, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

English Summary: The rains will intensify in the state from today
Published on: 23 July 2020, 11:24 IST