सण उत्सव सुरु झाल्यापासुन डाळी आणि कडधान्याचे दर वाढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभरा, मसूर, उडीद, मूग, वाटाणा व शेंगदाणे दरात मोठ्या प्रमाण वाढ झालेली दिसुन येते आहे. तुरडाळीच्या दरामध्येही प्रचंड वाढ झालेली असून होलसेल मार्केटमध्ये दर प्रतिकिलो 165 वर पोहचले आहेत.
देशभर डाळी आणि कडधान्याचा तुटवडा निर्माण झालेला असुन मागील वर्षी उत्पादन कमी झाले आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नसल्यामुळे पेरण्या वेळेवर झालेल्या नाहीत यामुळे नवीन पीक कमी येण्याची शक्यता आहे. विदेशातूनही पुरेशी आयात होत नसल्यामुळे सर्वच मार्केटमध्ये डाळी आणि कडधान्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. एक महिन्यापूर्वी 55 से 68 रुपये किलो दराने विकला जाणारा हरभरा 60 ते 75 रुपये किलो दरावर पोहचला आहे.
मसूरडाळीचे भाव 63 ते 75 वरून 70 ते 80 प्रतिकिलोवर गेले आहेत. उडीदडाळीचे भाव 85 ते 120 रुपये किलोवरुन 100 ते 130 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. शेंगदाण्याचे दरही 100 ते 130 वरून 150 पर्यंत गेले आहेत. तुरडाळ 105 ते 165 प्रतिकिलो झाली आहे. मूगडाळ 80 ते 128 वरुन 100 ते 130 झाली आहे. हरभरा डाळ 75 ते 80 झाली आहे.यामुळे सण उत्सवाच्या काळात दरांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
Published on: 05 October 2023, 03:12 IST