विदर्भातील वाशिम जिल्ह्यात तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे. गत आठवड्यात सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाणारी तुर आता सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत आहे. तुरीच्या बाजारभावात आज सुमारे पाचशे रुपये प्रतिक्विंटल वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे.
खरीप हंगामात नैसर्गिक अवकृपेचा सर्वच पिकांना मोठा फटका बसला होता, खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस समवेतच तुर पिकाला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते. जास्तीच्या पावसामुळे व वातावरणातील प्रतिकूल बदलामुळे तुरीच्या उत्पादनात घट नमूद करण्यात आली होती. उत्पादनात घट तर झालीच शिवाय तुर जोपासण्यासाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा खर्च देखील करावा लागला त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असल्याचे शेतकऱ्याद्वारे सांगितले गेले. खरीपात झालेल्या नुकसानीमुळे खरिपातील सर्व पिकांना सुरुवातीला चांगला बाजारभाव मिळत होता. खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनला सुरुवातीला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त झाला. सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत होता. मात्र असे असले तरी आता हंगाम अंतिम टप्प्यात आला आणि सोयाबीनचे दर 6200 रुपये प्रति क्विंटल वर येऊन फिक्स झालेत.
तूर पिकाला शासनाने सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव ठरवून दिला आहे मात्र गत महिन्यात तुरीला सात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजार भाव प्राप्त होत होता. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसापासून या दोन्ही शेतमालाच्या बाजारभावाला उतरती कळा लागली आहे. मात्र आता तुरीच्या बाजार भावात थोडीशी सुधारणा होत असल्याचे चित्र बाजारपेठेत नजरेस पडत आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत तुरीला सरासरी सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर प्राप्त होत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना तूर्तास दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे.
वाशीम जिल्ह्यात एकीकडे तुरीला समाधान कारक बाजार भाव प्राप्त होत आहे तर दुसरीकडे तुरीच्या आवक मध्ये देखील वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. गत आठवड्यात वाशिम जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामिळून सहा ते सात हजार क्विंटल तूरीची आवक दररोज नमूद करण्यात आली. सोमवारी वाशिम जिल्ह्यातील सर्व बाजारपेठ मिळून दहा हजार क्विंटल एवढी विक्रमी आवक झाली असल्याचे सांगितले गेले. दरम्यान जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी अद्यापही तुर विक्री करण्यास उत्सुक दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या मते या हंगामात तूर पिकासाठी उत्पादन खर्चात अधिक वाढ झाली आहे त्यामुळे सध्या प्राप्त होत असलेले दर जरी समाधानकारक वाटत असले तरी त्यापासून विशेष असा लाभ प्राप्त होणार नाही आणि म्हणून भाववाढीची अपेक्षा असल्याचे शेतकरी बांधव नमूद करत आहेत.
Published on: 25 January 2022, 07:38 IST